मुंबई : महसुलवाढीसाठी जागांचा लिलाव करण्याकरीता पालिका प्रशासनाने दिलेल्या जाहिरातीला मोठमोठ्या विकासकांनी प्रतिसाद दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्टच्या रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा अशा तीन जागांचा लिलाव करण्याकरीता पालिका प्रशासनाने जाहिरात दिली होती. मात्र या लिलावासाठी अर्ज करण्याकरीता पालिका प्रशासनाने अजून पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत आटत असून एका बाजूला मोठमोठ्या प्रकल्पांसाठी येत्या काळात मोठ्या निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे पालिकेच्या मुदतठेवीही कमी होत आहेत. सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव मुलुड जोड रस्ता, रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीची कामेही मोठ्या प्रमाणावर येत्या काळात करण्यात येणार आहेत. पालिकेने आता आपल्याच काही जमिनींचा लिलाव करून त्यातून महसूल उभा करण्याचे ठरवले आहे. पालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात याबाबतचे सूतोवाच केले होते. त्यानुसार जागांचा लिलाव करण्याकरीता ऑक्टोबर महिन्यात प्रथमच जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार काही मोठ्या विकासकांनी प्रतिसाद दिला आहे. या विकासकांसोबत पालिकेची नुकतीच पूर्वबोली बैठकही पार पडली. मात्र तरीही पालिका प्रशासनाने या निविदा प्रक्रियेला पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली. दरम्यान, पालिकेच्या जाहिरातीला प्रतिसाद देत आतापर्यंत एल. ॲण्ड टी., गोदरेज अशा काही मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मलबार हिल येथील जागेचा लिलाव करण्यास या परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे या जागेबाबत कंपन्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या जागा सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (सीआरझेड)मध्ये येतात का याबद्दलही विचारले होते. त्यावर पालिकेने विकासकांना उत्तरे दिली आहेत.
हेही वाचा – कांद्याचा मलिदा कुणी खाल्ला ? जाणून घ्या, खरेदी केलेला चांगला कांदा कुठे गेला
दरम्यान, या जागांसाठी विकासक पुढे आले असले तरी भविष्यात जागांचा विकास झाल्यानंतर जागेची मालकी मात्र पालिकेचीच राहणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्टच्या रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा अशा तीन जागांचा लिलाव करण्याचे ठरवले होते. त्यापैकी मलबार हिलची जागा देण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे. ही जागा उद्यानासाठी राखीव आहे. त्यामुळे स्थानिकांची मागणी पाहता मलबार हिलमधील या भूखंडाची प्रक्रिया थांबवण्याची मागणी आमदार मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांकडे नुकतीच केली होती. मात्र या विरोधाला न जुमानता लिलाव सुरूच ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.