स्वाइन फ्लूचा कहर वाढण्याची चिन्हे असून गुरुवारी रात्री वारासणी येथील एका रुग्णाचा या आजाराने मृत्यू ओढवला. मुंबईत स्वाइन फ्लूच्या शहराबाहेरील रुग्णांची संख्या १५ झाली असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील स्वाइन फ्लूचे निदान झालेल्या रहिवाशांची संख्याही चारने वाढून १४ वर पोहोचली आहे.
उत्तर प्रदेश येथील वारासणीमधून आलेल्या ५८ वर्षांच्या पुरुषाचा पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्याला ३ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. कस्तुरबा रुग्णालयातील स्वाइन फ्लूचा हा तिसरा मृत्यू असून होली स्पिरीट, अंधेरी व जसलोक रुग्णालयात इतर दोन मृत्यू झाले. हे रुग्ण जळगाव, बदलापूर, पालघर आदी भागातून आले होते. शहरातील रुग्णांपकी काही जणांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. जानेवारीपासून राज्याच्या अंतर्गत भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली तरी मुंबईत हा आजार पसरला नव्हता. मात्र गेल्या चार दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांना सज्ज ठेवण्यात आले आहे.
थंडीचा कालावधी लांबल्याने स्वाइन फ्लूच्या विषाणूंची वाढ अधिक झाली, असे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारयांचे म्हणणे आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णाचे निदान झाल्यावर तातडीने त्याच्या कुटुंबियांची तपासणी करण्यात येत असून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे शहरात स्वाइन फ्लूची लागण झालेला रुग्ण सापडला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील वसंतविहार भागातील सिद्धंचल परिसरात राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा