कोटय़वधी रुपये देऊनही रेल्वे प्रशासनाकडून सफाईकडे दुर्लक्ष; अपयशाचे खापर फुटल्याने पालिकेकडून पैशाच्या हिशेबाची मागणी

रेल्वेच्या हद्दीतून जाणारे नाले आणि  मार्गाखालून जाणाऱ्या मोऱ्या मुसळधार पावसात तुंबत असल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे हाल होत आहेत. नाले, मोऱ्या आणि मार्गालगतच्या गटारांची साफसफाई करण्यासाठी कोटय़वधी रुपये देऊनही रेल्वे प्रशासन साफसफाई करीत नसल्याने पालिकेवर खापर फुटत आहे. त्यामुळे आता पालिकेने सफाईच्या कामासाठी दिलेल्या पैशांचा हिशेब रेल्वेकडे मागण्यास सुरुवात केली आहे. परंतु रेल्वे प्रशासनाकडून पालिकेला हिशेबही देण्यात टाळाटाळ केली जात आहे. त्यातच दादरच्या टिळक पुलासाठी पैसे देऊनही त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. यावरून पालिका आणि रेल्वेमध्ये भविष्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.पालिका आणि रेल्वेमध्ये भविष्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

रेल्वेच्या हद्दीमध्ये जाऊन पालिकेला साफसफाई करता येत नाही. मात्र दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेमार्गात पाणी तुंबून रेल्वे सेवा विस्कळीत होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गेली अनेक वर्षे पालिका रेल्वे प्रशासनाला रेल्वेच्या हद्दीतील नाले आणि मोऱ्यांच्या साफसफाईसाठी पैसे देत आली आहे. पैसे मिळाल्यानंतर आपल्या हद्दीतील साफसफाई करून घेण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे.

मात्र साफसफाई न झाल्यामुळे नाले आणि मोऱ्या तुंबून रेल्वे सेवेला फटका बसत आहे. त्याचे खापर मात्र पालिकेवर फुटत आले आहे.

रेल्वे हद्दीतील साफसफाईबाबत अहवाल सादर करण्यात येत नसल्याबद्दल ‘कॅग’ने ताशेरे मारले आहेत. तरीही रेल्वेकडून अद्याप अहवाल सादर करण्यात आलेला नाही. पालिका नित्यनियमाने दरवर्षी पैसे देत आली आहे.

आतापर्यंत कोटय़वधी रुपये रेल्वेला देण्यात आले आहेत. पण त्या पैशांचा विनियोग कशा पद्धतीने केला याचा साधा अहवाल रेल्वे पालिकेला देत नाही, अशी खंत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

केवळ मोऱ्या, नाल्याच्या सफाईसाठीच नव्हे, तर धोकादायक बनलेल्या दादरच्या टिळक पुलाच्या दुरुस्तीसाठी पालिकेने रेल्वेला तीन कोटी रुपयांहून अधिक पैसे दिले आहेत.

पण अद्याप टिळक पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, या प्रकरणावरून पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

यंदाही चार कोटी दिले

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर तब्बल १४० मोऱ्या आहेत. शहरांतील नाल्यांमधून वाहणारे पाणी या मोऱ्यांमधून पुढे जाते. कुर्ला आणि टिळक नगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या हद्दीत १.५ कि.मी. लांबीचा कारशेड नाला आहे. रेल्वेच्या हद्दीचा प्रश्न असल्याने पालिकेला तेथे साफसफाई करता येत नाही. परिणामी, मोऱ्या आणि या नाल्याच्या साफसफाईसाठी पालिकेकडून दरवर्षी पैसे दिले जातात. तसे यंदाही चार कोटी रुपये पालिकेने रेल्वेला दिले. मात्र तरीही मुसळधार पाऊस पडल्यानंतर रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले आणि काही काळ रेल्वे विस्कळीत होऊन त्याचा मुंबईकरांना फटका बसला.

Story img Loader