मुंबई : येत्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठक हाणामारीने गाजली. पीओपी मूर्ती निर्माते विरुद्ध शाडू माती मूर्तिकार परस्परांना भिडले. बैठकीत पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या एकमेकांवर फेकण्यात आल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. पीओपी मूर्तींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शाडू मूर्तींसाठी लढा देणारे वसंत राजे या मारहाणी जखमी झाले असून याप्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी केली. ही बंदी येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील गणेशोत्सवातही लागू राहणार असून त्यानुसार आतापासूनच मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांची बैठक बोलवली होती. परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केवळ मुंबईतील शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपी मूर्तीचे निर्माते यांना बोलावण्यात आले होते. मात्र ही बैठक निर्णयांपेक्षा हाणामारीनेच गाजली.

ही बैठक सुरू होण्यापूर्वीच शाडू मातीपासून मूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपीचे कारागीर एकमेकांना भिडले. सुरुवातीला त्यांनी एकमेकांवर शेरेबाजी केली. त्यानंतर शाब्दीक चकमक उडली आणि एकमेकांवर पाण्याच्या बाटल्या, माईक , खुर्च्या फेकण्यात आल्या. या वादातच बैठक पार पडली. बैठकीनंतर सर्व मूर्तिकारांचे प्रतिनिधी महापालिकेतून बाहेर पडले. मात्र पीओपी मूर्ती विरोधात भूमिका घेणारे वसंत राजे यांच्यावर रस्त्यात दोघांनी हल्ला केला. दरम्यान, अन्य काही मूर्तिकारांनीही आपल्याला मारहाण केली, असा आरोप राजे यांनी केला. या मारहाणीत राजे यांच्या डोक्याला, ओठाला, छातीला मार लागला आहे. राजे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून केईएम रुग्णालयात त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

पूर्वनियोजित कट

आपल्याला पीओपीपासून मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांनी मारहाण केल्याचा आरोप राजे यांनी केला आहे. ही तत्वांची लढाई होती ती अशा पद्धतीने लढणे अयोग्य असल्याचे मत राजे यांनी व्यक्त केले. मला मारण्याचा कट पूर्वनियोजित होता, असाही आरोप त्यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीत काय घडले

यंदाचा गणेशोत्सव पूर्णतः पर्यावरणपूरक असेल असे पालिका प्रशासनाने बैठकीत जाहीर केले. पीओपी मूर्ती घडवण्यास पूर्णतः मनाई असेल असेही स्पष्ट करण्यात आले. शाडूच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाईल व शाडूची माती पुरवली जाईल असेही जाहीर करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आली असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.