हिंमत असेल, तर मरीन ड्राइव्ह येथील खुल्या व्यायामशाळेला हात लावून दाखवा, असे आव्हान शिवसेनेने दिले असून ‘अंगावर आला, तर शिंगावर घेऊ,’ अशी धमकीच महापालिका प्रशासनाला दिली आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलेली अनधिकृत व्यायामशाळा महापालिकेने उखडून टाकल्याने खवळलेल्या शिवसेनेने ती पुन्हा उभारून आता हात लावूनच दाखवा, असे प्रतिआव्हान दिले आहे. शिवसेनेच्या दंडेलशाहीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी तीव्र विरोध केला असून ही व्यायामशाळा न हटविल्यास त्या शेजारी महिला बचत गटाची विक्री केंद्रे उभारण्याचा इशारा दिला आहे.
या व्यायामशाळेसाठी ‘सी’ विभाग कार्यालयाकडून परवानगी घेण्यात आली नसताना ती उभारली गेल्याने महापालिका प्रशासनाने कारवाई केली. पण ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी कारवाई झाल्याने शिवसेना नेते संतप्त झाले. महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यावर दबाव आणण्यात आला. त्यानंतर ही अनधिकृत व्यायामशाळा पुन्हा उभारण्यात आली आणि परवानगी घेण्याची विशेष सवलत देण्यात आली. या व्यायामशाळेजवळ शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि महिला संघटक सुरेखा परब यांनी फलक लावला असून िहमत असल्यास कारवाई करावी, असे आव्हान दिले आहे.
त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या व्यायामशाळेला स्थानिक नागरिकांचा विरोध असून ती अनधिकृत आहे. तरीही राजकीय दबाव टाकून तिला संरक्षण दिल्यास व्यायामशाळेशेजारी महिला बचत गटांची वेगवेगळ्या वस्तूंची विक्री केंद्रे सुरू करण्यात येतील, असे अहिर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा