गेल्या काही वर्षांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची चुरस लागली असून त्यामुळे गोविंदांचे जीव धोक्यात आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा सुरू केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने घातलेले र्निबध सर्वोच्च न्यायालयाने उठविले असले तरी भविष्यात गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धार अ‍ॅड. स्वाती पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडीची उंची आणि १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागाबद्दल घातलेले र्निबध सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांसाठी उठविले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारी उंच थर रचले जातील. पण थर रचताना गोविंदा जायबंदी होतील, त्याला जबाबदार कोण, असा सवाल थरांवर बंदी आणायची मागणी करणाऱ्या स्वाती पाटील यांनी केला आहे. आम्हाला नोटीस मिळाल्यानंतर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. चुरशीमुळे जीवघेण्या बनलेल्या या उत्सवात गोविंदा सुरक्षित व्हायला हवा, त्यासाठी ही लढाई भविष्यात अशीच सुरू ठेवली जाईल, असेही ‘लोकसत्ता’शी बोलताना स्वाती पाटील यांनी सांगितले.
अपघात होतच राहणार
अपघात टळावेत यासाठी थरांवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने यंदा पुन्हा एकदा मुंबईत जीवघेणा खेळ होणार आहे. दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करावा, पण त्याचे व्यापारीकरण थांबविणे गरजेचे आहे. मात्र यंदाही अपघात होतच राहणार आणि त्याची झळ गोविंदांच्या कुटुंबियांना बसणार, असे पहिले महिला गोविंदा पथक म्हणून मान मिळविलेल्या प्रबोधन कुल्र्याच्या गोरखनाथ दहीहंडी पथकाचे प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी सांगितले.
८ वर्षांवरील मुलांसाठी न्यायालयात जाणार
बाल हक्क संरक्षण आयोगाने १२ वर्षांखालील मुलांना थरासाठी केलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. मात्र आठ वर्षांवरील मुलांना दहीहंडी फोडता यावी यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, असेही गीता झगडे म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा