शहरात ‘फोर जी’ तंत्रज्ञान आणण्यासाठी रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीला खोदकाम करण्यास महानगरपालिकेच्या आयुक्तांनी परवानगी दिली असली तरी यामुळे विविध ठिकाणी जलवाहिन्या तसेच मल:निसारण वाहिन्या फुटून नागरिकांची गरसोय होत आहे. त्यामुळे रिलायन्सविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्षांनी बुधवारी दिले.
रिलायन्स कंपनीला रस्ते खोदकामासाठी परवानगी मिळाली असली तरी रस्त्याखालील जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या, दूरध्वनी यंत्रणा याबाबतचा नकाशा त्यांच्याकडे नाही. स्थानिक वॉर्ड कार्यालयालाही ते माहिती देत नसल्याने गेल्या काही दिवसांत अंधेरी येथे दोन वेळा जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या, असा मुद्दा सभागृहनेते यशोधर फणसे यांनी बुधवारी स्थायी समितीत उपस्थित केला. मंगळवारी संध्याकाळी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या बाजूला फुटलेली जलवाहिनी दुरुस्त झाली नसल्याने अंधेरीत बुधवारीही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यापूर्वी मिल्लतनगर येथील जलवाहिनी फुटली होती. रिलायन्सच्या खोदकामामुळे ऑगस्ट क्रांती मदान येथेही मलनि:सारण वाहिनी फुटली होती. रिलायन्सला परवानगी देण्यात आली असली तरी पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हे काम होणे गरजेचे आहे.
या खोदकामामुळे नागरिकांची गरसोय होत आहे. खोदकामामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई रिलायन्सकडून घेण्यात यावी व कंपनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी प्रशासनाला सांगितले. रिलायन्सला खोदकामाची परवानगी ऑगस्टमध्ये देण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत कितीवेळा नागरी सोयी-सुविधांचे नुकसान झाले, त्याची माहिती प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे.