शिवस्मारकाच्या पायाभरणीवेळी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. हे सर्व ज्यांनी घाईघाईने श्रेय लाटण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या लोकांचे प्राण संकटात आणले, त्याला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर प्रथम गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी असे राऊत यांनी म्हटले.

बुधवारी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट दगडावर आदळून पाण्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला होता.

राऊत म्हणाले, या कार्यक्रमासाठी सरकारच्या माध्यमातून कोणी परवानगी दिली, समुद्रातून इतक्या लोकांना कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना इतक्या लोकांना कसे नेण्यात आले. कोणतीही पूर्व तयारी नसताना पायाभरणीचा घाट का घातला याची चौकशी होईल तेव्हा होईल. पण ज्या सगळ्यांनी, ते कितीही मोठे नेते असतील. त्यांनी निदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी तरी राजकारण करु नये.

पोलिसांनी अशा बोटी समुद्रात उतरवण्यास परवानगी दिली होती का, त्यांच्याकडे अशी लेखी परवानगी मागण्यात आली होती का, बोटिंग संदर्भात सुरक्षा चाचण्या घेतल्या होत्या का, बोट चालक प्रशिक्षित होता का, हे पाहण्याचे संबंधित विभागाच्या पोलीस प्रमुखाची व या सोहळ्याचे नेतृत्व करणाऱ्याची जबाबदारी होती. त्यामुळे जे गुन्हेगार आहेत त्यांना सरकारने सोडू नये, असे ते म्हणाले.