मुंबई : राज्यातील पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात होत असली तरी महायुतीत दक्षिण मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक मतदारसंघांचा तिढा अद्यापही कायम होता. नाशिकची जागा शिवसेना लढविणार असून, ठाणे मतदारसंघावर अजून चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमध्ये उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची अजून घोषण झालेली नाही. शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मुंबईतील सहा, ठाण्यातील चार आणि नाशिकमधील तीन अशा १३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरू होणार असून ही मुदत ३ मेपर्यंत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आला तरी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात १३ मतदारसंघांतील सर्व जागांचे वाटप निश्चित झालेले नाही.
हेही वाचा >>>जिवंत बाळ जन्माला येऊ नये अशा पद्धतीने गर्भपात करण्यास परवानगी, बाळात दोष आढळल्याने याचिकाकर्तीची मागणी
कुठे अडले ?
’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्याचा मतदारसंघ मिळावा अशी शिंदे गटाची भूमिका असली तरी भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सुरू झाली तरी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघाचा तिढा सुटू शकलेला नाही.
’ दक्षिण मुंबईत गेल्या वेळी शिवसेनेने अरविंद सावंत हे विजयी झाले होते. सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. गेल्या वेळी शिवसेनेने ही जागा जिंकल्याने महायुतीत शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. भाजपला या जागेवर डोळा आहे.
’ नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. पण भाजपचा नाशिकसाठी आग्रह होता. शिंदे ही जागा सोडण्यास तयार नाहीत. मग भाजपने छगन भुजबळ यांचे नाव पुढे केले. पण तीन आठवडे वाट बधून काहीच निर्णय होत नसल्याने अखेर भुजबळांनी माघार घेतली. गोडसे हे आपलीच उमेदवारी पक्की असल्याचे सांगत असले तरी पक्षाने अधिकृतपणे त्यांचे नाव जाहीर केलेले नाही.
’ वायव्य मुंबईत शिंदे गटाचे गजाजन कीर्तिकर हे खासदार असले तरी प्रकृतीच्या कारणावरून ते लढणार नाहीत. हा मतदारसंघ मिळावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. पण शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. चित्रपट अभिनेता गोिवदा यांचे नाव शिंदे गटात चर्चेत होते.
’ भाजपने मुंबईतील तीनपैकी दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली. उत्तर मध्य मुंबईच्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा अद्यापही निर्णय झालेला नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लढावे, अशी पक्षाची योजना असली तरी त्यांची तयारी नाही.