अक्षय मांडवकर
कच्च्या तेलाच्या साठवणुकीची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने क्षेत्रफळ वाढविण्याचे काम
कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ च्या भुयारीकरणासाठी सुरू असलेल्या उत्खननातून निघालेल्या मातीने जवाहर द्वीपवर भराव टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
कच्च्या तेलाच्या साठवणुकीची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने या द्वीपवर भराव टाकून त्याचे क्षेत्रफळ वाढविण्याचे काम ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ (बीपीटी)कडून करण्यात येत आहे. त्यासाठी ८ लाख टन मातीची आवश्यकता असून दक्षिण मुंबईतील उत्खनन स्थळांमधून बाहेर पडलेल्या ४ लाख टन मातीचा पुरवठा ‘मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळा’ने (एमएमआरसीएल) आजवर ‘बीपीटी’ला केला आहे.
पूर्णपणे भुयारी स्वरूपात असलेल्या भारतातील पहिल्या मेट्रो-३ या प्रकल्पाचे काम सध्या शहारात वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी ३३ किलोमीटरच्या भुयारीकरणाचे काम करण्यात येणार आहे. काम जलद गतीने होण्यासाठी त्याची विभागणी सात पॅकेजमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या चार पॅकेजमध्ये सुरू असलेल्या उत्खननामधून निघालेल्या मातीचा पुरवठा ‘बीपीटी’ करण्यात येत आहे. अरबी समुद्रात एलिफंटा बेटानजीक असलेल्या जवाहर द्वीपवर ‘मरिन ऑइल टर्मिनल’ उभारण्याचा प्रकल्प ‘बीपीटी’ने ‘बीपीसीएल’ आणि ‘एचपीसीएल’ हाताशी धरून आखला आहे. त्यासाठी सर्वप्रथम बेटावर कच्च्या तेलाच्या साठवणुकीची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. मात्र बेटाचे एकूण क्षेत्रफळ पाहता साठवणुकीची क्षमता वाढविणे शक्य नाही. त्यामुळे मेट्रो-३ च्या मातीचा वापर करून बेटाला लागून असलेल्या समुद्रातील १३ एकरावर भराव टाकण्यात येत आहे.
या भरावाच्या जमिनीचा विस्तार ६३५ मीटर असेल. त्यामुळे या जागेत ४.२८ लाख टन कच्च्या तेलाच्या साठवणुकीची क्षमता असलेल्या टाक्या बांधता येणार आहेत. १६ टाक्या बांधण्यात येणार आहे. यातील प्रत्येक टाकीची २६,८०० टन कच्चे तेल साठवून ठेवण्याची क्षमता असेल. मेट्रो -३ च्या दक्षिण मुंबईतील कफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक या पॅकेज १ आणि आझाद मैदान, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड या पॅकेज २ मधील उत्खननातून निघालेली माती बीपीटीच्या रे रोड येथील जागेत टाकली जात आहे. भरावाच्या कामासाठी ८ लाख टन मातीची आवश्यकता असून यासाठी मेट्रो ३ च्या पॅकेज १ ते ४ मधील मातीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बीपीटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच आजतागायत ‘एमएमआरसी’ने रे रोड येथील जागेवर टाकलेल्या ४ लाख टन मातीच्या आधारे जवाहर द्वीपवर भरावाच्या कामाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.