लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विकासकामांसाठी गोरेगाव (पश्चिम) येथील पहाडी गावातील पाणथळ जागेवर भराव टाकण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मंजुरीला जनहित याचिकेद्वारे गुरूवारी उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्य़ायालयानेही या जनहित याचिकेची दखल घेऊन महानगरपालिकेसह, महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला (एमसीझेडएमए) नोटीस बजावली आणि याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
तथापि, या पाणथळ जागेवर भराव टाकण्याच्या कामाला अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची विनती मात्र मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नाकारली. याचिकेत उपस्थित करण्यात आलेला मुद्दा गंभीर आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात येत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पर्यावरणप्रेमी झोरू भाथेना यांनी ही जनहित याचिका केली आहे. या याचिकेत, पहाडी परिसरातील संबंधित सखल भूखंड हा पाणथळ परिसर असून तो सर्व बाजूंनी खारफुटींनी वेढलेला आहे. हा पाणथळ परिसर ४७२ एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महानगरपालिकेने या परिसराभोवती कुंपण बांधण्यास आणि तेथे विकासकामे करता यावीत म्हणून त्यावर भराव टाकण्यास परवानगी दिली होती. परंतु, हा परिसर किनारा नियमन क्षेत्र-१ (सीआरझेड) मध्ये मोडतो. मुंबईच्या १९९१ आणि २०३४ सालच्या विकास आऱाखड्यातही हा भूखंड सीआरझेड-१ मध्ये दाखवण्यात आलेला आहे.
कायद्याने सीआरझेड परिसरात त्यातही पाणथळ परिसरात कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे. असे असतानाही विकासकामे करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने पर्यांवरणीय नियमांचे उल्लंघन करून पहाडी येथील पाणथळ जागेवर भराव टाकण्यास परवानगी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पाणथळ जागेवर भराव टाकण्यास उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयानेही प्रतिबंध केला आहे. नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारही पाणथळ जागांवर सगळ्याच विकासकामांना मज्जाव असल्याचे भाथेना यांनी याचिकेत म्हटले आहे.
पाणथळ जागांचे संरक्षण, संवर्धन करणे घटनात्मक कर्तव्य
पाणथळ जागा आणि लगतच्या खारफुटीच्या परिसराभोवतीची सुमारे ९.८ एकर जागेवर आधीच भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे, नैसर्गिक जलप्रवाह रोखला गेला आहे, असा दावाही याचिकाकर्त्याने याचिकेद्वारे केला आहे. पाणथळ जागा नष्ट करणे नाही, तर त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रतिवाद्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. ही याचिका निव्वळ मुंबईतील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतुने आली आहे, असा दावाही देखील याचिकाकर्त्याने केला आहे.
याचिकेतील मागण्या
या पाणथळ जागेवर भराव टाकण्यास आणि विकासकामे करण्यास कायमस्वरूपी मज्जाव करावा. ही जागा पूर्ववत करण्याचे आदेश महानगरपालिकेला द्यावेत आणि याचिका निकाली निघेपर्यंत या जागेवर भराव टाकण्यापासून किंवा विकासकामे करण्यापासून प्रतिवाद्यांना रोखावे, अशा प्रमुख मागण्या याचिकाकर्त्याने याचिकेत केल्या आहेत.