‘विंगेतील गलबल्या’मुळे कलाकारांची राजकीय रंगमंचाकडे पाठ

नेता आणि अभिनेता हे समीकरण फार जुने असले, तरी आता राजकारणात माजलेल्या गोंधळामुळे विशेषत: विधानसभा निवडणूक लढण्यास कलाकार अनुत्सुक असल्याचे चित्र आहे.

Actor not keen to join electoral politics
या निवडणुकीत राज्यात एकही नवा चेहरा अभिनय क्षेत्रातून दिसला नाही.

मुंबई : बदलत्या परिस्थितीत गढूळ झालेले राजकीय वातावरण आणि गोंधळाच्या स्थितीमुळे सिने-नाट्य कलाकार निवडणुकीच्या राजकारणात येण्यास आता फारसे उत्सुक नसल्याचे दिसते. त्यातही लोकसभा निवडणुकीत काही कलाकारांचे चेहरे राजकीय रंगमंचावर दिसत असले, तरी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मात्र नेते होण्यास अभिनेते अनुत्सुक आहेत. उर्मिला मातोंडकर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बॉलीवूडने राज्यातील राजकारणाकडे पाठ फिरविली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांनी अलीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणातील कलाकारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अभिनेते-अभिनेत्रींना राजकारणाच्या पटलावर आणून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्याची रणनीती पक्षांकडून आखली जाते. मात्र ही शक्कल आता उपयोगी पडत नसल्याचे दिसते. बदलत्या परिस्थितीत अभिनेते-अभिनेत्री निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. विशेषत: विधानसभा लढण्यास फारसे कलाकार उत्सुक नसतात. विधानसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत खूपच लहान असल्याने लोकांशी थेट संपर्क येतो. लोकांना सतत दिसणारा व कधीही उपलब्ध असलेला आमदार हवा असतो. त्यामुळे सुजाण झालेला मतदार कलाकारांना मतदान करीत नसल्याचा अनुभव काही जण सांगतात. मतदारांमध्ये जागरूकता आली असल्याने कलाकारांच्या लोकप्रियतेचाही फारसा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. २००९ मध्ये शिवसेनेने अभिनेता आदेश बांदेकर यांना तिकीट दिले होते. मात्र लोकप्रियतेच्या लाटेवर असतानाही त्यांना पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा >>> उमेदवारी अर्ज आजपासून, मात्र जागावाटपाचा तिढा कायम; नाराजांच्या मनधरणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची धावाधाव

यात भर म्हणून सध्याच्या राजकारणातील अनिश्चितता ही कलाकारांनी पाठ फिरविण्याचे आणखी एक कारण आहे. सध्या राज्यात सहा प्रमुख पक्ष आणि दोन मुख्य आघाड्या आहेत. प्रत्येक मतदारसंघांत अनेक नेते इच्छुक असताना त्यांच्या मागण्या पूर्ण करणे पक्षांना जड जात आहे. एकास एक लढत झाल्यास कलाकारांच्या लोकप्रियतेचा फायदा होत असल्याचा अनुभव असल्यामुळेच राजकीय पक्षही त्यांना तिकीट देण्यास आता टाळाटाळ करीत आहेत.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी माधुरी दीक्षित, करीना कपूर यांच्या नावांची चर्चा होती. माजी खासदार गोविंदा यांनीही निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला, मात्र निवडणूक लढले नाहीत. या निवडणुकीत राज्यात एकही नवा चेहरा अभिनय क्षेत्रातून दिसला नाही. राज्याबाहेर कंगना राणावत, अरुण गोविल, शत्रुघ्न सिन्हा आदी कलाकार मात्र निवडून आले. यापूर्वी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार राम नाईक यांना पराभूत करून गोविंदा यांनी सर्वांनाच धक्का दिला होता. तर १९९८-९९ मधील लालकृष्ण अडवाणी विरुद्ध राजेश खन्ना ही लढतही गाजली होती.

कारणे काय?

●निवडणुकीला उभे करण्यासाठी राजकीय पक्षांना करावी लागणारी कलाकारांची मनधरणी

●निवडणुकीसाठी खर्च करण्यास कलाकारांची टाळाटाळ, उलट शूटिंग बुडाल्याने पक्षाकडेच पैशांची मागणी

●प्रचारासाठी किंवा नंतर राजकारणासाठी पुरेसा वेळ देण्यात अडचणी. कडक उन्हात प्रचार करण्याची तयारी नसणे

●जिंकून आल्यानंतरही कामे केली नाहीत म्हणून टीका होऊन प्रतिमा बिघडण्याची कलाकारांना भीती

●विरोधी पक्षाच्या नाराजीमुळे अभिनय क्षेत्रात कामे मिळविताना अडचणी येण्याचा धोका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Film and theater actors not very keen to enter electoral politics zws

First published on: 22-10-2024 at 03:59 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या