गोरेगाव येथील ‘दादासाहेब फाळके चित्रनगरी’लाही आता खासगीकरणाचे वेध लागले आहेत. ‘बॉलीवूड पर्यटना’च्या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी)च्या माध्यमातून चित्रनगरीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सल आणि लंडनधील पायोनिअर फिल्मसिटीपेक्षाही चांगल्या सोयीसुविधा येथे करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विभाग महामंडळाने चित्रनगरीच्या विकासाचा आराखडा तयार केला असून, तो मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्यानुसार चित्रपटांच्या निर्मितीपूर्व आणि पश्चात सर्व प्रकारच्या प्रक्रियांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही चित्रपट, मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर किंवा परदेशात जाण्याची गरजच नसल्याची माहिती महामंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

अशी आहे चित्रनगरी..  
गोरेगावमध्ये ५२० एकरपेक्षा अधिक जागेत विस्तारलेल्या चित्रनगरीत सध्या १६ स्टुडिओ आणि ४४ बाह्य़चित्रीकरण स्थळे आहेत. देशातील एकूण चित्रपट निर्मितीमध्ये मुंबईचा वाटा ६० टक्के असून त्यातील ३० टक्के निर्मिती चित्रनगरीत होते.
संग्रहालयही..
चित्रपट उद्योगाच्या शताब्दीचे औचित्य साधून भव्य बॉलीवूड संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यात राजा हरिश्चंद्र ते आजच्या चित्रपटांपर्यंतचा, या क्षेत्रातील मान्यवरांच्या जीवनाचा आणि चित्रपट उद्योगाचा आलेख असेल. चित्रपटसृष्टीतील मराठीचे योगदान लक्षात घेऊन दोन एकर जागेत मराठी संस्कृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
नवे रूप, नवे रंग
चित्रनगरीत अत्याधुनिक ५१ स्टुडिओंची उभारणी करण्यात येणार आहे. पूर्णत: वातानुकूलित असणाऱ्या या स्टुडिओमध्ये थ्री-डी, फोर-डी चित्रीकरणाचे तंत्रज्ञानही असेल. यातील दोन स्टुडिओ केवळ मराठी चित्रपटांसाठीच आरक्षित असतील. खास मालिकांच्या चित्रीकरणासाठी उपयुक्त ठरणारी पंजाब, राजस्थान, बिहार, तामिळनाडू, गुजरात या राज्यांच्या संस्कृतीचे प्रतिबिंब असणारी पाच गावे वसविण्यात येणार आहेत, तर सहा एकरांवर महाराष्ट्रातील भिन्न प्रांतीय संस्कृतीची प्रतीके म्हणजेच वाडे, वस्त्या, प्रार्थनास्थळेही उभारण्यात येणार आहेत. स्टुडिओबरोबरच बाह्य चित्रीकरणासाठी ४० एकर जागेत आणखी २० ठिकाणे विकसित करण्यात येणार आहेत.