मुंबई : अंकूर, निशांत, मंडी, मंथन यासारखे गंभीर विषय असोत की वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा असे हलकेफुलके कथानक… दोन्हीही तितक्याच समर्थपणे हाताळताना समांतर चित्रपट मुख्य प्रवाहातही लोकप्रिय करणारे प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे सोमवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले बेनेगल यांच्यावर मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी निरा आणि मुलगी पिया असा परिवार आहे. बेनेगल यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बेनेगल गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावला आणि वोक्हार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी संध्याकाळी ६.३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालविल्याचे पिया बेनेगल यांनी सांगितले. वोक्हार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. स्वत: बेनेगल यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या आजारपणाबाबत माहिती देताना नियमितपणे ‘डियलिसिस’ करून घ्यावे असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा >>> जाहिरात ते सिनेमा…

स्वातंत्र्योत्तर काळात, पन्नाशीच्या दशकात सुरू झालेली समांतर चित्रपटांची चळवळ सत्तरीच्या दशकामध्ये लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या चित्रपटकर्मींमध्ये बेनेगल यांचे महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या सात दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी ग्रामीण जीवनापासून स्त्रीवादापर्यंत अनेक गंभीर विषय हाताळलेच, पण समाजातील कमतरतांवर अचूक बोट ठेवणाऱ्या उपाहासात्मक कलाकृतीही घडविल्या. त्याच वेळी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, शेख मुजिबुर रहेमान यांची जीवनचरित्रेही त्यांनी आपल्या खास शैलीत रुपेरी पडद्यावर आणली. एकीकडे एकापेक्षा एक सरस चित्रपटांचे दिग्दर्शन करतानाच ‘भारत एक खोज’, ‘संविधान’ अशा अजरामर माहितीपट मालिकाही त्यांनी घडविल्या. समांतर चित्रपट केवळ बुद्धिमान प्रेक्षकांसाठी असतात, सर्वसामान्यांना त्यात फारशी रुची निर्माण होऊ शकत नाही असे अनेक समज त्यांनी यशस्वीपणे खोडून काढले.

 ‘नूर इनायत’च्या जीवनपटाची इच्छा अपूर्ण

१४ डिसेंबरला आपल्या वाढदिवसानिमित्त ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत २-३ प्रकल्पांवर काम करत असल्याचे बेनेगल यांनी म्हटले होते. गेल्यावर्षीच बांगलादेशचे राष्ट्रपुरूष शेख मुजिबुर रहेमान यांचा जीवनपट ‘मुजिब : द मेकिंग ऑफ ए नेशन’ याचे दिग्दर्शन बेनेगल यांनी केले होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील गुप्तहेर नूर इनायत यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर आणण्याची त्यांची मनिषा होती.

श्याम बेनेगल यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले. त्यांच्या कथा मांडणीच्या पद्धतीचा भारतीय चित्रपटसृष्टीवर सखोल ठसा उमटला. भिन्न स्तरातील लोक त्यांच्या कामाची प्रशंसा करत राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांचे सांत्वन. ओम शांती. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Story img Loader