सिडकोने नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नबांधणीसाठी दोन एफएसआय मागणीचा प्रस्ताव  मंगळवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवला आहे. सिडकोची ही बैठक नागपूर येथे होणार असल्याने नवी मुंबईतील वाढीव एफएसआयचा निर्णय नागपूर मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान,सिडकोतर्फे भविष्यात बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेला अडीच एफएसआयचा प्रस्ताव सध्या नगरविकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी पडून आहे.
राज्य शासनाने २००५ रोजी घरांची उपलब्धी वाढावी यासाठी शासकीय गृहनिर्माण संस्थांना अडीच एफएसआय देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार म्हाडाने हा प्रस्ताव मंजूर करुन जादा घरांच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. सिडकोने नुकत्याच त्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी अडीच एफएसआय मंजूर करुन तो नगरविकास विभागाकडे पाठविला आहे. सिडको यापूर्वी हा एफएसआय केवळ निवासासाठी एक व निवास अधिक वाणिज्यिक वापरासाठी दीड देत होती. त्यामुळे सिडकोला घरनिर्मिताला काही मर्यादा पडल्या होत्या. ही उणीव लक्षात घेऊन सिडकोने वाढीव एफएसआयचा प्रस्ताव मंजूर केला. सिडकोच्या या निर्णयावर शासनाने शिक्कामोर्तब केल्यास खारघर तळोजा परिसरात बांधण्यात येणाऱ्या नियोजित दहा हजार घरांच्या संख्येत वाढ होणार आहे. हाच मुद्दा पकडून ज्या इमारती २५-३० वर्षांपूर्वी बांधल्या होत्या, त्या आता मोडकळीस आल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्बाधणीबाबत सिडको गांभिर्याने विचार करीत आहे. या जून्या इमारतींची अवस्था दयनिय असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे.
वाशीतील जेएनवन जेएनटु प्रकारच्या इमारती  र्जजर झाल्या असून तेथील अनेक लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यामुळे गेली २० वर्षे सिडकोने बांधलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीचे घोंगडे भिजत पडलेले आहे.  शहरातील अशा इमारतींना दोन वाढीव एफएसआय देण्यात यावा असा प्रस्ताव सिडकोने संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. अडीच एफएसआय मिळाल्यास विकासक या इमारतींचा पुर्नविकास करण्यात रस घेतील असा जाणकारांचे मत आहे.
दरम्यान विकासकांनी या इमारतींचा पुर्नविकास करण्या ऐवजी सिडकोनेच करावा,अशी एक मागणी काँग्रेसने केली आहे. सिडकोने स्वत:साठी घेतलेला वाढीव एफएसआयही संपूर्ण शहरासाठी लागू करण्यात आल्याची आवई मध्यंतरी उठविण्यात आली होती. एफएसआयचे हे श्रेय राष्ट्रवादीला मिळू नये, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे तर येत्या निवडणूकींपूर्वी हा प्रश्न सुटावा म्हणून राष्ट्रवादी जंगजंग पछाडत आहे.    

Story img Loader