मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला घेऊन जुलैमध्ये मुळ ६७२ रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न आहे.
पत्राचाळीचा २००८ पासून रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळ मार्गी लावत आहे. विकासकाने अर्धवट सोडलेल्या पुनर्वसित इमारतींचे काम सध्या मंडळ पूर्ण करीत आहे. विकासकाने ६७२ मुळ रहिवाशांसाठीच्या १२ मजली आठ इमारतींचे (१६ विंगसह) ४० टक्के काम केले होते. उर्वरित ६० टक्के काम पूर्ण करण्याची जबाबदारी मंडळावर होती. या कामासाठी निविदा काढून मार्च २०२२ मध्ये बांधकामाला सुरुवात करण्यात आली. पुनर्वसित इमारतीचे कामाचे ‘मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लिमिटेड’कडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुनर्वसित इमारतींचे काम वेगात पूर्ण करून २०२३ मध्ये घरांचा ताबा देऊ, असे मुंबई मंडळाने जाहीर केले होते. पण हे काम अद्याप पूर्ण झालेले नसून ६७२ रहिवाशांना घराची प्रतीक्षा आहे. याअनुषंगाने पत्राचाळीतील पुनर्वसित इमारतींच्या कामाबाबत मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली.
सध्या काम वेगात सुरू आहे. मे अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काम पूर्ण झाल्यानंतर निवासी दाखला घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. निवासी दाखला मिळाल्यानंतर घरांचा ताबा देण्यात येईल. यासाठी दीड-दोन महिने वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैपासून रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.