अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ परवान्यासाठी ‘ऑनलाईन भेटी’ची वेळ देण्याच्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता पक्क्या वाहन परवान्यासाठीही ‘ऑनलाईन भेटी’ची वेळ देण्याची पद्धत लागू करण्यात येणार असल्याची माहिती अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.
भेटीसाठी लावण्यात येणारी रांग, त्यात होणारे गैरव्यवहार आणि दलाल यांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी शिकाऊ परवाना धारकांसाठी ३० डिसेंबर २०१३ पासून ऑनलाईन भेटीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ आत्तापर्यंत ५ हजार ५४१ जणांनी घेतला असून यातील ६२३ उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत. १८ ते ३१ जानेवारी २०१४ या कालावधीत ३ हजार ८२४ जण या सेवेचा लाभ घेणार आहेत.
भेटीची वेळ घेतलेले १५ ते २० टक्के उमेदवार वेळेवर हजर राहात नसल्याचे दिसून आल्याने आता प्रत्येक दिवशी ३५० जणांऐवजी ४०० जणांना ऑनलाईन भेटीसाठी वेळ दिला जाईल. ज्या उमेदवारांना ऑनलाईन भेटीची वेळ घेणे शक्य नाही,अशाच उमेदवारांना ऑफलाईन भेटीची वेळ देण्यात येईल, कळसकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा