मुंबई : मुंबईत मोसमी वाऱ्यांच्या आगमनाला दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने दडी मारली होती. हवामान विभागाचे इशारे आणि पावसाचा लपंडाव सुरू होता. मात्र काहीशा विश्रांतीनंतर बुधवारी रात्रीपासून पावसाने मुंबई शहर आणि उपनगरात हजेरी लावली. दरम्यान, मुंबईत पुढील २४ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच दिवसभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. मात्र, जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बुधवार मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यादरम्यान वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच कमाल तापमान ३३-३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पालिकेच्या पर्जन्यमापक केंद्रावरील नोंदीनुसार बुधवार सकाळी ८:३० ते गुरुवार सकाळी ८:३० पर्यंत मुंबई (२९.२६ मिमी), पूर्व उपनगरांत (२४.८३ मिमी), पश्चिम उपनगरांत (१९.५८ मिमी) पावसाची नोंद झाली.
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली. त्याचबरोबर वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. बुधवारी सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला.
अरबी समुद्रात मोसमी वारे सक्रिय असल्याने दोन दिवस राज्यात पाऊस सक्रिय राहील. आज मुंबई, ठाणे, पुणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा – गोंधळाची चाहूल; विद्यामान विधानसभेचे अखेरचे अधिवेशन आजपासून
नवी मुंबईतही दमदार हजेरी
नवी मुंबईत बुधवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळीही पावसाचा जोर कायम होता.
रायगड जिल्ह्यात मुसळधार
मुरुड – ८० मिमी
रोहा- १३७ मिमी
सुधागड-१०८ मिमी
महाड-८६ मिमी
पोलादपूर – ७१ मिमी