बनावट प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी केल्याप्रकरणी चौकशी सुरू
शैलजा तिवले, मुंबई</strong>
परळच्या कॉलेज ऑफ फिजिशिअन अॅण्ड सर्जन (सीपीएस) महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बेकायदेशीररीत्या नोंदणी करणाऱ्या ५८ डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने या डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
सीपीएस महाविद्यालयाची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी करण्याचा घोटाळा २०१६ साली उघडकीस आला होता. या प्रकरणात २० डॉक्टर दोषी आढळले असून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. अशा पद्धतीने सीपीएस महाविद्यालयाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून एमएमसीकडे नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी एमएससीने सुरू केली.
२०१७-१८ या वर्षांत ५८ डॉक्टरांनी सीपीएस महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी केल्याचे एमएमसीने उघडकीस आणले. यात स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शल्यविशारद आदी डॉक्टरांचा समावेश आहे. बेकायदेशीररीत्या नोंदणी करून हे डॉक्टर रुग्णांना सेवा देत होते.
खोटी प्रमाणपत्रे सादर करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरांची नोंदणी एमएमसीने रद्द केली. खोटी प्रमाणपत्रे पुरविणाऱ्या टोळीचा छडा लावण्यासाठी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार एमएमसीने दिली होती. या आधीचा गुन्हा भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने हा गुन्हादेखील तिथेच दाखल करण्यात यावा, असे सांगत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात होती. या संबंधीचे वृत्त ‘५८ बनावट डॉक्टर मोकाटच! ’ या मथळ्याखाली १६ सप्टेंबर रोजी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अखेर एमएमसीच्या तक्रारीनुसार आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या ५८ बनावट डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
५७ डॉक्टर आणि यांना कागदपत्रे पुरविणारा एक डॉक्टर अशा ५८ डॉक्टरांविरोधात बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील डॉक्टरही सहभागी आहेत. या डॉक्टरांना नोटीस पाठविण्यात आली असून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमधून दोषी आढळल्यास त्यांना अटक करण्यात येईल, असे आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड यांनी सांगितले.