मुंबई : प्रशांत महासागरात अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ला – निनाची स्थिती सक्रीय झाली आहे. पण, ला – निना स्थिती खूपच कमकुवत असून, जेमतेम अडीच महिने म्हणजे मार्च अखेरपर्यंत सक्रीय राहण्याची शक्यता आहे. ला – निना कमकुवत असल्यामुळे भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.

भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात ला – निना स्थिती निर्माण झाली आहे. प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा ०.७ अंश सेल्सिअसने कमी झाले आहे. त्यामुळे ला – निना स्थिती निर्माण झाली, असे सांगितले जात आहे. प्रत्यक्षाच ही स्थिती कमकुवत आहे, हेच तापमान सरासरीपेक्षा ०.९ अंश सेल्सिअसने कमी झाले असते तर ला – निनाची स्थिती मजबूत आहे, असे म्हणता आले असते. कमकुवत ला – निना स्थिती मार्चअखेर सक्रीय राहण्याची शक्यता आहे. शिवाय कमकुवत ला – निनामुळे जागतिक हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. भारतीय उपखंड आणि भारतावरही फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.
भारतीय हवामान विभागासह जागतिक हवामान संघटना आणि अमेरिकेची हवामान संघटना जुलैअखेर पासून ला – निना सक्रीय होण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. जुलैअखेर पासून डिसेंबर अखेरपर्यंत ला – निना सक्रीय झाला नव्हता. पावसाळ्याचे चार महिने प्रतिक्षा करूनही आणि शक्यता असूनही ला – निनाने हुलकावणी दिली होती.

हेही वाचा – वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण

हेही वाचा – ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन

देशावर फारसा परिणाम नाही

जानेवारीपासून ला – निना स्थिती निर्माण झाली आहे. पण, खूप कमकुवत आहे. किमान मार्चच्या मध्यापर्यंत ला – निना स्थिती राहील. महाराष्ट्र आणि देशावर या ला – निनाचा फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. हिवाळ्याच्या सुरुवातीला ला – निना सक्रीय झाला असता तर तुलनेने थंड हिवाळा अनुभवता आला असता. आता तेही शक्य दिसत नाही, अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

Story img Loader