मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर विकास हक्क हस्तांतराचा (टीडीआर) पर्याय देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या बाबत विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यामुळे लवकरच अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे एअरपोर्ट फनेलवासीयांच्या सुमारे चारशे इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे.
एअरपोर्ट फनेलवासीयांच्या पुनर्विकासाचा प्रश्न नोव्हेंबर २०१६ मध्ये पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्यात आलेली नव्हती. या परिसरात इमारतीच्या उंचीवर बंधने असल्यामुळे पुनर्विकास पूर्ण ठप्प झाला होता. अखेरीस सध्या उपलब्ध असलेल्या चटईक्षेत्रफळाइतके बांधकाम करून या बांधकामाचा खर्च निघेल इतका टीडीआर देण्याच्या प्रस्तावाबाबत एकमत झाल्याचे कळते. या शिवाय आणखी टीडीआर देता येईल का, याचाही विचार सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातही घोषणा केली. दहा मजल्यांपर्यंत बांधकाम करता येईल, इतका टीडीआर देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अधिसूचना जारी केली जाणार आहे. हरकती व सूचना मागवून अंतिम अधिसूचना जारी केली जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – छायाचित्रांतून अटल सेतूचे दर्शन
या इमारतीच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने याआधी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार विलेपार्ले व सांताक्रूझ परिसरासाठी अनुक्रमे ४.४८ व ४.९७, तर कुर्ला परिसरासाठी ९.२२ चटईक्षेत्रफळ प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु इमारतीच्या उंचीवर बंदी असल्यामुळे हे चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नव्हते. या निमित्ताने निर्माण होणारा विकास हक्क हस्तांतर (टीडीआर) इतरत्र वापरण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव होता. परंतु तो व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट करीत फेटाळण्यात आला होता.
या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटई क्षेत्रफळ मिळावे आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्रफळवजा जाता उर्वरित चटईक्षेत्रफळ टीडीआर स्वरूपात विकण्याची परवानगी देऊन बांधकामाचा खर्च निघावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. तीच मागणी सरकारने मान्य केल्याचे कळते.
‘एअरपोर्ट फनेल’ म्हणजे काय?
सांताक्रूझ पूर्व-पश्चिम, विलेपार्ले पूर्व-पश्चिम, कुर्ला, घाटकोपर या उपनगरातील इमारतींना सांताक्रूझ आणि पवन हंस या विमानतळांचे फनेल झोन (विमानाचे उड्डाण आणि उतरण्याच्या मार्गावरील परिसर) लागू आहेत. या फनेलमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियम लागू आहेत. दोन ते तीन मजल्यांपर्यंतच उंचीची मर्यादा असल्यामुळे या इमारतींना लागू करण्यात आलेल्या एक चटई क्षेत्रफळात या इमारतींचा पुनर्विकास होणे अशक्य आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. स्वखर्चाने इमारतींचा पुनर्विकास करण्याची ऐपत नाही, अशा स्थितीत हे रहिवासी भरडले गेले आहेत.
हेही वाचा – ६६ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पुण्यातून अटक
टीडीआर म्हणजे?
एखाद्या भूखंडावर संपूर्ण चटईक्षेत्रफळ वापरता येणे शक्य नसते तेव्हा ते इतरत्र वापरण्याची मुभा दिली जाते. त्यालाच टीडीआर म्हणतात.