वर्षांनुवर्षे विजेपासून वंचित असलेल्या आरेतील नवशाचा पाडा अखेर रविवारी प्रकाशाने उजळून निघाला.
मुंबई : झगमगत्या मुंबईतच वसलेला आरेतील नवशाचा पाडा कैक वर्षे अंधारातच होता. येथील आदिवासींनी त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर, त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळून अखेरीस रविवारी नवशाचा पाडा उजळून निघाला. या पाडय़ातील ७० पैकी ३७ घरांना रविवारी वीजजोडणी करण्यात आली.
आरेमध्ये वेगवेगळ्या शासकीय प्रकल्पांना, आस्थापनांना जमिनी देण्यात आल्या आहेत. त्यावर काही पाडे वसलेले आहेत. या पाडय़ांमध्ये कोणतेही काम करावयाचे असल्यास संबंधित आस्थापनेची परवानगी लागते. नवशाचा पाडा हा मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येत असल्यामुळे तेथील वीज-पाणीजोडणीसाठी महाविद्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे होते. पाडय़ातील आदिवासी २००९ पासून याबाबत पाठपुरावा करत आहेत. ट्रान्सफॉर्मर असूनदेखील वीजजोडणी होत नव्हती. अखेरीस ३ जूनला महाविद्यालयाने ना हरकत दिल्यानंतर पाडय़ात वीज आणि पाणी येण्याचे मार्ग खुले झाले.
‘पाडय़ातील ७० पैकी ३७ घरांना वीजजोडणी झाली असून लवकरच पाणीपुरवठय़ाचे कामदेखील मार्गी लागणार आहे. रविवारी वीजजोडणीदरम्यान आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी उपस्थित होते; त्यांनी आठवडय़ाभरात पाणीपुरवठय़ाचे काम सुरू होईल, असे आश्वासन दिले आहे,’ असे आदिवासी हक्क संवर्धन समिती, मुंबईचे पदाधिकारी प्रकाश भोईर यांनी सांगितले. आरेमधील सर्व पाडय़ांतील आदिवासींनी एकत्र येऊन यावर्षी २८ जूनला अनेक प्रलंबित मागण्यांसाठी महाविद्यालयावर धडक मोर्चा नेला होता.
आरेमधील २७ पाडय़ांचे एकत्रीकरण करून त्यांचे स्थलांतर करण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात येथील आदिवासींनी सध्या आंदोलन पुकारले आहे. हक्काच्या शेतजमिनी सोडून स्थलांतर करण्याबाबत आदिवासींनी विरोध दर्शविला आहे. आरेमध्ये येणाऱ्या नवीन प्रकल्पांना सर्व सोयीसुविधा मिळतात, पण आदिवासींना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याबद्दल आदिवासींमध्ये यंत्रणांविरोधात रोष आहे. पाडय़ातील विजेचा प्रश्न मार्गी लागला असला तरी इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.