लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर मंगळवारपासून सुरुवात केली. दुरुस्तीचे काम सुरू झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपूर्वी घराची रक्कम भरलेल्या आणि गृहकर्जाचा समान मासिक हप्ता सुरू झालेल्या ८०० हून अधिक कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. युद्धपातळीवर दुरुस्ती करून १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने पात्र विजेत्यांना घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील पनवेलमधील कोन येथील २४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. या सोडतीला सात वर्षे पूर्ण झाली असून ८०० हून अधिक पात्र विजेत्यांचा गृहकर्जाचा समान मासिक हप्ता सुरू झाला आहे. मात्र अद्यापही विजेत्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही. करोना अलगिकरणासाठी घेतलेली ही घरे रायगड जिल्हाधिकांऱ्यांकडून परत मिळत नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी ही घरे परत केल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीवरून म्हाडा विरुद्ध एमएमआरडीए यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे विजेत्यांना घरांचा ताबा देता आला नाही. पण आता मात्र दुरुस्तीचा वाद निकाली निघाला असून प्रत्यक्ष घरांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. प्रकल्पस्थळी मंगळवारी एका छोटेखानी कार्यक्रमात गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या हस्ते दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली.
आणखी वाचा-खासदार संजय राऊत यांच्या घरी आढळला साप, पत्रकार परिषदेत उडाला गोंधळ
कोन येथे ११ इमारतींमध्ये गिरणी कामगारांची २,४१७ घरे आहेत. या ११ इमारतींमधील घरांच्या दुरुस्तीसाठी ११ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कररानुसार दुरुस्तीचे काम सुरू झाल्यापासून सहा महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. असे असले तरी गृहकर्जाचा हप्ता सुरू झालेल्या पात्र विजेत्यांच्या घरांच्या दुरुस्तीचे काम प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच १५ ऑक्टोबरपासून त्यांना घरांचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती सुनील राणे यांनी दिली.