लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी पूर्ण झाली असून हे दोन्ही पूल गुरुवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. जुहू अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली असून या परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश दिला जाणार असून अवजड वाहनांच्या वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाली. मात्र अंधेरी पश्चिम दिशेला असलेला बर्फीवाला पूल आणि गोखले पूल यांची पातळी वरखाली झाली होती. त्यामुळे बर्फीवाला पूल बंदच ठेवावा लागला होता. तसेच या दोन पुलांमध्ये अंतर पडल्यामुळे मुंबई महापालिकेवर टीकाही झाली. तसेच महापालिकेच्या कारभाराचे हसेही झाले. त्यामुळे गोखले पूल व बर्फीवाला पूल जोडण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबई आयआयटी आणि व्हिजेटीआय या संस्थांची मदत घेतली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार जॅक लावून पुलाचा काही भाग वर खेचून दोन्ही पुलांची पातळी समतल करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून ४ जुलैपासून बर्फीवाला पूल सुरू करण्यात आला. सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडल्यानंतर, वाहतूक व्यवस्थापनाची संबंधित कामे व चाचण्या पूर्ण करून गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून हा बहुप्रतीक्षीत पूल सुरू झाला. मार्गिका खुली केल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी सायंकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

आणखी वाचा-सुमारे ४५० गुंतवणुकदारांची २० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक, दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल

सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांच्याद्वारे आरेखित करण्यात आला होता. तर, पूल जोडणी कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे निश्चित करण्यात आली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने या कार्यपद्धतीची पडताळणी करून त्यात काही सुधारणा सुचवल्या. सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली. या पुलावर जुहूपासून अंधेरी असा पश्चिम – पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्ट्रक्चरली सेफ) असल्याचे ‘व्हिजेटीआय’मार्फत घोषित करण्यात आले आहे. पुलाच्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थापना संबंधित अनुषांगिक कामे व चाचण्या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर गुरुवारी ही मार्गिका सुरू करण्यात आली.

७८ दिवसात काम पूर्ण

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिलीमीटर वर उचलण्यात आला. या जोडणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून अथक कामे सुरू होती. हे आव्हानात्मक काम दिवस रात्र सुरू ठेवून ७८ दिवसांत पूर्ण करण्यात आले.

आणखी वाचा-ई तक्रारीमुळे देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करणे शक्य

हलक्या वाहनांनाच प्रवेश

गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अवजड वाहनांना वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलद गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण करतानाच सी. डी. बर्फीवाला पुलाची दुसरी बाजू जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.