Mumbai Gold Stolen From Locker News : एका फायनान्स कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेलं २१ कोटी रुपये किंमतीचं २९ किलो सोनं अनाधिकृतपणे गहाण ठेऊन त्याबदल्यात कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. शिवकुमार अय्यर (३०), शिवाजी पाटील (२९), सराफा व्यापारी सचिन साळुंके (४१) अशी या तिघांची नावे आहेत. शिवकुमार अय्यर आणि शिवाजी पाटील फायनान्स कंपनीचे कर्मचारी असून त्यांनी हा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचं सांगितले जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोव्हर फायन्सस कंपनीच्या डोंबिवली शाखेत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आकाश पचलोड यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रोव्हर फायन्सस कंपनीने एप्रिल २०२४ मध्ये फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ताब्यात घेतली होती. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या कर्ज विभागाचे ऑडीट सुरू केले. मात्र, यावेळी त्यांना लॉकरमध्ये असलेलं २१ कोटी रुपये किंमतीचं २९ किलो सोने गहाळ झाल्याचं लक्षात आलं.
याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापक शिवकुमार अय्यर (३०) आणि अन्य एक कर्मचारी शिवाजी पाटील (२९) यांना विचारपूस केली. सुरुवातीला त्यांनी याचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र, त्यानंतर त्यांनी हे सोनं गहाण ठेऊन कर्ज घेतल्याचं तसेच ही कर्जाची रक्कम सराफा व्यापारी सचिन साळुंके (४१) याच्या मार्फत शेअर बाजाराच गुंतवल्याचे त्यांनी कबूल केलं. तसेच त्यांनी शेअर बाजारात नुकसान झाल्याचीदेखील माहिती दिली.
विशेष म्हणजे यापूर्वी तक्रारदार आकाश पचलोड यांनी ४ जून रोजी आरोपींची भेट घेऊन गहाळ झालेल्या सोन्याबाबत विचारणा केली होती. पण यावेळी आरोपींनी आपले अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगत त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – मुंबईत हंगामातील ८६ टक्के पाऊस, गुरुवारीही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
दरम्यान, आकाश पचलोड यांच्या तक्रारीनंतर आता गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रॉपर्टी सेलने तिघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०८, ४०९, ५०६, ५०६ ब, ४२० आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे करण्यात येत आहे.