मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार याप्रमाणे येत्या पाच वर्षांत २५ हजार नव्या लाल परी बस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक बोलावली होती. त्यात एसटीची सद्या:स्थिती सरनाईक यांनी सांगितली. सध्या महामंडळाकडे फक्त १४ हजार ३०० बस असून त्यापैकी १० वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या १० हजार बस आहेत. त्यापुढील तीन ते चार वर्षांत त्या प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वमालकीच्या बस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी पाच हजार नवीन गाड्या याप्रमाणे पुढील पाच वर्षांत २५ हजार लाल परी घेण्याची योजना आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याला तत्त्वत: मान्यता देण्यात आली असून २०२९ सालापर्यंत २५ हजार बस व पाच हजार विद्याुत बस याप्रमाणे ३० हजार बसचा ताफा एसटीकडे असेल.