मुंबई : मराठी चित्रपटांसमोर ‘ओटीटी’सह नव्या माध्यमांची, तंत्रज्ञानाची अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी केली. मराठी भाषा जगली पाहिजे, टिकली पाहिजे आणि वाढवली पाहिजे, मात्र, त्यासाठी इतरांच्या मनात मराठी भाषेविषयी तेढ निर्माण करण्यापेक्षा मराठी भाषेच्या अभिव्यक्तीसह सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याची सरकारची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात २१ ते २४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रपताका’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोमवारी आशीष शेलार आणि ‘महाराष्ट्र भूषण’ अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ‘ऑलिम्पिया थिएटर’ येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात ‘चित्रपताका’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असेही शेलार यांनी या वेळी जाहीर केले.

कार्यक्रमाप्रसंगी चित्रपट निर्माते किरण शांताराम, ज्येष्ठ चित्रपटकर्मी जब्बार पटेल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवोदित कलाकारांसाठी ऑडिशनयोजना

● राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नवोदित कलाकारांसाठी ‘ऑडिशन’ योजना सुरू करण्यात आल्याची माहिती या वेळी अभिनेता सुबोध भावे यांनी दिली.

● पुढील चार दिवस ही योजना मोफत असून, त्यानंतर नाममात्र दरात ही योजना सुरू राहणार आहे. इच्छुक नवोदित कलाकारांनी अकादमी येथे येऊन ऑडिशन द्यायची. यामधून निर्माते-दिग्दर्शक यांना कलाकारांची निवड करता येणार आहे.