मुंबई : लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या लिलावती रुग्णालयात मागील २० वर्षांत तब्बल १२५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ट्रस्टने १७ जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यात सात माजी विश्वस्तांसह उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेत्यांचा समावेश आहे. त्यातील बहुतेक आरोपी हे दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असलेले अनिवासी भारतीय आहेत.
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या कारभाराची जबाबदारी सध्याच्या संचालक मंडळाने स्वीकारल्यानंतर शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार माजी संचालक मंडळाने केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे कामकाजातील अनियमितता उघडकीस आणण्यासाठी संचालक मंडळाने फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ट्रस्टच्या निधीचे परदेशातील खात्यांमध्ये बेकायदेशीरपणे हस्तांतरण, कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, फसव्या गुंतवणूका आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी असे गंभीर गैरव्यवहार झाल्याचे दिसले. तसेच सुमारे १२५० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खुलासा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये झाला. या कारवायांमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता (५५) यांनी माजी विश्वस्तांसह १७ जणांविरोधात वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. परंतु, पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याने त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने वांद्रे पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिल्याची माहिती लिलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
तीनवेळा एफआयआर…
लिलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्य करताना आरोपींनी विविध कंपन्या आणि त्यांच्या संचालकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी एफआयआरमध्ये केला आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, संगणक, औषधे, रुग्णवाहिका, जमीन आणि इमारती, सर्जिकल साहित्य, औषधांचे साहित्य, वकील शुल्क आदींच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा समावेश आहे. या प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै २०२४ मध्ये १२ कोटींची फसवणूक झाल्याबाबत एफआयआर दाखल केली. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये ४४ कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी एफआयआर १२५० कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याबाबत एफआयआर दाखल केल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या प्रकरणी विश्वस्तांनी आता अंमलबजावणी संचालनालयालाही पत्र पाठवले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी विनंती केली असल्याचे सिंग यांनी सांगितले.