मुंबई: देशाच्या प्रगतीसाठी आर्थिक साक्षरता वाढवणे गरजेचे आहे. अन्य कोणत्याही मुद्दय़ांपेक्षा तरुणांनी आर्थिक अंगांनी विचार करण्याची सवय लावून घ्यावी. तसे न झाल्यास बिकट परिस्थिती ओढवेल, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. रायगड येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकाच्या ‘युवा छावणी’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
आठ दिवस चालणाऱ्या या ‘युवा छावणी’मध्ये महाराष्ट्रभरातून तरुण सहभागी झाले आहेत. तरुणाई समोर जागतिक आव्हानांचा पट मांडतानाच कुबेर यांनी १९९१ च्या आर्थिक सुधारणांपासून देशाचे बदलते आर्थिक चित्र स्पष्ट केले. चीनची समाजवादी विचारसरणी असताना उत्पादकता वाढवणे, आर्थिक उन्नती यांवर त्यांनी भर दिल्याचेही कुबेर यांनी म्हटले. साधी राहणी म्हणजे गरिबीचे उदात्तीकरण नव्हे, संपत्ती निर्मिती होणार नसेल तर दारिद्र्याचेच वाटप एकमेकांना करावे लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सध्याचे सर्व सामाजिक प्रश्न हे आर्थिक प्रश्नांशी जोडलेले आहेत. आपली गरज काय आहे? मंदिर-मशीद की भाकरी हे लोकांनी ठरवायला पाहिजे. संधीची उपलब्धता ही तरुणांची मागणी असेल तर ती सक्षमपणे होतेय का? असा सवालही कुबेर यांनी केला.
यावेळी तरुणांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरं देताना कुबेर म्हणाले की, आपल्या समस्यांवर विचार भावनिकतेने नव्हे तर बुद्धी तर्काच्या आधारावर करायला हवा. धर्मवाद, दंगली यातून प्रश्न सुटत नाहीत. आपल्याकडे शिक्षणावर २.५ ते ३ टक्के एवढाच खर्च होतो. वैज्ञानिक संशोधनाला वाव नाही. ३५ टक्के नोकऱ्या कमी होणार हे अहवाल आहेत. त्यात स्वयंचलित यंत्रणांच्या विकासामुळे आपले रोजगार आणखी कमी होणार आहेत. या बदलत्या परिस्थितीचा बुद्धीच्या आधारे विचार केल्यास त्यावर उत्तरे सापडतील.
यावेळी साने गुरुजी स्मारकाच्या माज़ी अध्यक्ष नीरजा, पत्रकार युवराज मोहिते, सरचिटणीस राजन इंदुलकर, माधुरी पाटील आदी उपस्थित होते.
स्वभान ते समाजभान
युवा छावणी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शिबीर मानले जाते. गेल्या दोन दशकांत हजारो तरुण-तरुणी यातून तयार झाले असून विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत. खुला संवाद करत ‘स्वभान ते समाजभान’ हा विचार रुजवला जात आहे. पुढील सात दिवसांच्या या छावणीत विवेक सावंत, डॉ. आशिष देशपांडे, अभिजीत देशपांडे, प्रा. विनय र.र, हिना कौसर, संजय मंगो, प्रमोद निगुडकर असे विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.