मुंबई : ओमकार रिॲल्टर्स आणि डेव्हलपर्सचे प्रवर्तक बाबूलाल वर्मा आणि अध्यक्ष कमल किशोर गुप्ता यांना विशेष न्यायालयाने बुधवारी आर्थिक गैव्यवहाराच्या आरोपांतून दोषमुक्त केले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याबाबत (पीएमएलए) सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारे दिलेला हा पहिलाच निर्णय असून अंमलबजावणी संचालनालयासाठी (ईडी) हा मोठा धक्का आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने वर्मा आणि गुप्ता या दोघांची मूळ गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्याच्या आधारे त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मूळ गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने या दोघांविरोधात तक्रार नोंदवली होती. परंतु मूळ गुन्ह्यांत दोघांची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलएप्रकरणी नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने या दोघांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर या दोघांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतूनही दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

विशेष न्यायालयाने गुप्ता आणि वर्मा या दोघांचे म्हणणे मान्य करून त्यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतून दोषमुक्त केले. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडी तक्रार नोंदवून तपास सुरू करते. मात्र मूळ गुन्ह्यात आरोपी दोषमुक्त किंवा निर्दोष सुटला असेल तर ईडीने नोंदवलेल्या प्रकरणातूनही त्याची सुटका होते, असे सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यातील निकालात म्हटले होते.

दरम्यान, वर्मा आणि गुप्ता यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्याची ईडीची विनंती अमान्य केली होती. तसेच विशेष न्यायालयाच्या आदेशाबाबतही काही आदेश देण्यास नकार दिला होता. ईडीने आपले म्हणणे विशेष न्यायालयासमोर मांडावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. विशेष न्यायालयात वर्मा आणि गुप्ता यांच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच उच्च न्यायालय हस्तक्षेप करेल. प्रकरण विशेष न्यायालयासमोर असल्याने तिथेच ऐकले जावे, असेही न्यायालयाने ईडीला दिलासा तातडीचा दिलासा नाकारताना नमूद केले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial of abuse case crackdown ed omkar realtors acquitted mumbai print news ysh
Show comments