राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यासाठी काही कडक अटी घातल्या असतानाच ठाण्यात कोटय़वधी रुपयांची उधळण करीत दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी यंदा उत्सवातून माघार घेतल्याने मुंबईतील तमाम गोविंदा पथके गोंधळली आहेत. ठाण्यात मिळणाऱ्या मोठय़ा रकमेच्या पारितोषिकावर अवलंबून उत्सव साजरा करणाऱ्या या पथकांची आर्थिक घडी विस्कटण्याची चिन्हे आहेत.
दहीहंडी परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे, रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, दहीहंडी २० फूट उंच असावी, थरासाठी १८ वर्षांवरील मुलांनाच परवानगी द्यावी, त्यांना हेल्मेट-जॅकेट-सेफ्टी बेल्ट पुरवावे, थराखाली गाद्या घालाव्या, रात्री ८ वाजता कार्यक्रमाची सांगता करावी, आयोजक मंडळाची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असावी, ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पारितोषिक जाहीर केल्यास त्याचे विवरण सादर करावे, स्वयंसेवक नियुक्त करावे, मंडळ व स्वयंसेवकांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक सादर करावा आदी अटी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई-ठाण्यातील लहान-मोठे आयोजक उत्सव करायचा की नाही अशा पेचात पडले आहेत.
मुंबईच्या तुलनेत ठाण्यात मोठय़ा प्रमाणावर लाखो रुपयांच्या दहीहंडय़ा बांधण्यात येतात. उंच थर रचून बक्काळ पारितोषिक कमविण्याच्या आमीषाने मुंबईतील अनेक गोविंदा पथकांचे पाय ठाण्याच्या दिशेने वळतात. गेली अनेक वर्षे गोविंदा पथकांचा हा परिपाठच बनला आहे. या पारितोषिकांच्या रकमेतून या दिवशीचा सर्व खर्च भरून काढला जातो. गोपाळकाल्याच्या दिवशी गोविंदांना गणवेष, त्यांचा नाश्ता, जेवण, बसगाडय़ा आदींपोटी लाखो रुपये खर्च पथकातर्फे केले जातात. गोविंदा पथकाचा गोतावळा जेवढा मोठा, तेवढा खर्च अधिक. खर्च झालेली रक्कम मिळविण्यासाठी लाखो रुपयांची दहीहंडी फोडण्यासाठी अधिकाधिक उंच थर रचण्याचे प्रयत्न पथकांकडून केले जातात. आव्हाडांपाठोपाठ आता मुंबईतील काही आयोजकांनीही आयोजनातून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडायला कुठे जायचे असा प्रश्न पथकांपुढे पडला आहे. मुंबईमधील दहीहंडी समन्वय समिती कोणता निर्णय घेते याकडे तमाम गोविंदा पथकांच्या नजरा लागल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड नौटंकीबाज आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून गोविंदा साजरा करावा असे त्यांना वाटत नाही. सुरुवातीपासूनच त्यांची अशी भूमिका होती. पूर्वी दुष्काळ असतानाही त्यांनी धुमधडाक्यात उत्सव साजरा केला आहे. आतापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक छदामही दिलेला नाही किंवा योजनेत एकही चारा छावणी लावलेली नाही.
-आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप