‘नाटय़बिंदू हा आयुष्यातूनच शोधायचा असतो. त्याचा शोध घेण्यासाठीची अस्वस्थता कायम जपायला हवी. नाटक, मालिका, सिनेमा कशातही काम करा. पण, कितीही प्रलोभने आली तरी शोध आणि अस्वस्थता संपू देऊ नका. अस्वस्थ राहा,’ असा कानमंत्र ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सहभागी झालेल्या नाटकवेडय़ा तरुणाईला दिला.
गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या अखेरच्या पर्वात विजयाबाईंनी तरुणाईशी अतिशय सहज आणि मनमोकळा संवाद साधला. तात्त्विकतेबरोबरच आपल्या तरुणपणातील जणडघडणीला ज्या गोष्टी कारणीभूत झाल्या त्यांची आठवण जागवत विजयाबाईंनी आपल्या प्रवासाचे काही टप्पे श्रोत्यांसमोर उलगडले.
गिरगावातील आपली गँग, रंगायन, साहित्य संघातले दिवस, ‘हमिदाबाईची कोठी’ या नाटकाकरिता  घेतलेला एक अस्वस्थ शोध याविषयी बोलत विजयाबाईंनी अत्यंत सहजपणे नाटक, संगीत, साहित्य, चित्रपट अशा कलेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात ‘मुशाफिरी’ करताना कशाचे भान ठेवायला हवे, याचा मूलमंत्रच तरुणांना दिला.
‘अस्वस्थपणा, शोध, शिक्षण या गोष्टी कधीही संपत नाहीत. ज्या क्षणी ते संपतं त्या क्षणी तुम्ही स्थिरावता. त्यामुळे शिकण्यातली ईर्षां कमी होते,’ असा मोलाचा कानमंत्र त्यांनी दिला. तसेच हा शोध केवळ तरुणाईतच घ्यायचा असतो, असे नव्हे तर तो सतत सुरूच ठेवला पाहिजे, असेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.
हा शोध घेताना समोर असलेल्या प्रलोभनांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, ‘सुदैवाने आमच्या वेळेस प्रलोभने कमी होती, त्यामुळे आमच्या ते पथ्यावरच पडलं. आमच्याबरोबरचे जे प्रसिद्धीच्या मागे नव्हते त्यांच्या हातून बरेच काही तरी घडून गेले, पण जे बळी पडून प्रसिद्धीच्या झोतात आले ते वगैरे-वगैरेंच्या यादीत जाऊन बसले. त्यामुळे आपल्या कामावरची श्रद्धा कमी होऊ देऊ नका.’
तुम्ही मुलं आमच्या पिढीच्या तुलनेत खूपच हुशार आहात. तुम्हाला हवी असलेली माहिती ही एका बटनाच्या क्लिकवर उपलब्ध होते. मात्र, इतक्या सहजपणे माहिती उपलब्ध होण्याची सोय झाल्याने ती मिळविण्यासाठीची धडपड आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवाला तुम्ही पारखे तर होणार नाही ना याची मला काळजी वाटते. कारण, माहिती मिळविताना आम्हाला आमच्या काळात जी धडपड करावी लागत असे त्यामुळे आमचे आयुष्य अनुभवसंपन्न झाले, अशा शब्दांत त्यांनी तरुणाईला सावध केले.
‘हमिदाबाईची कोठी’ पुन्हा करणार
बऱ्याच वर्षांनंतर आपण ‘हमिदाबाईची कोठी’ हे नाटक पुन्हा करणार असल्याची घोषणा विजयाबाईंनी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या व्यासपीठावर करून नाटय़वेडय़ा रसिकांना सुखद धक्का दिला. नाटकासाठी जुळवाजुळव सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा