पाचगणी टेबललॅण्डवरील दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण आणि घोडागाडी सफारी सुरू करून घोडागाडी चालकांच्या पोटापाण्याच्या प्रश्न असा तिढा सोडविण्यासाठी याचिकादार, नगरपरिषद, पर्यावरणतज्ज्ञ सगळ्यांनीच एकत्र येऊन परस्पर सामंजस्याने उपाय शोधावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.
पाचगणी टेबलॅण्डवर ब्रिटिशांच्या काळापासून दुर्मीळ वनस्पती असून घोडागाडीमुळे त्या नष्ट होण्याची भीती व्यक्त करीत ‘बॉम्बे एन्व्हायर्मेट’ या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने हे आदेश दिले. पाचगणी टेबललॅण्डवरील दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण आणि घोडागाडी सफारी सुरू करून घोडागाडी चालकांच्या पोटापाण्याच्या प्रश्न, असा तिढा सोडविण्यासाठी गेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने एक समिती नियुक्त केली होती. पर्यावरण शास्त्रज्ञ अपर्णा वाटवे यांनी याबाबत दाखल केलेल्या अहवालाच्या पाश्र्वभूमीवर ही समिती नियुक्त करण्यात आली होती. नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी व घोडागाडी मालकांच्या वतीने एक प्रतिनिधी यांनी टेबललॅण्डवर घोडागाडी सफारी सुरू करण्यात आली, तर त्यामुळे दुर्मीळ वनस्पतींचे नुकसान होणार नाही ना तसेच आणखी कुठे ट्रॅक बनविता येऊ शकेल का, याचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने समितीला दिले होते. त्यानुसार या समितीने या परिसरात घोडागाडीसाठी अन्य कुठे ट्रॅक टाकता येतो का, याचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल शुक्रवारच्या सुनावणीच्या वेळी सादर केला. मात्र त्यावर उभयपक्षी एकमत न झाल्याने न्यायालयाने  वादी-प्रतिवादींप्रमाणेच पर्यावरणतज्ज्ञ, नगरपरिषदेचे पदाधिकारी आदींना एकत्रित बैठक घेऊन त्यावर परस्पर सामंजस्याने त्यावर उपाय शोधण्याचे आणि त्याबाबत ३१ जानेवारी रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Story img Loader