मुंबई : गुगलवर ट्रॅव्हल्स कंपनीचा क्रमांक शोधणे अंधेरीतील व्यावसायिकाला भलतेच महाग पडले. आरोपीने त्यांची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केली असून याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
अंधेरीमधील सहार रोड येथे वास्तव्यास असलेल्या ४४ वर्षांच्या तक्रारदारांचा स्वत:चा व्यवसाय आहे. त्यांना सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी संगमनेर येथील गावी जायचे होते. त्यासाठी भाड्याने मोटरगाडी घेण्यासाठी ते गुगलवर शोध घेत होते. शोध घेत असताना त्यांना एका ट्रॅव्हल्स कंपनीचा मोबाइल क्रमांक सापडला. त्यामुळे त्यांनी तिथे संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने स्वत:चे नाव रोहित असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठवून त्यात त्यांच्या माहितीसह काही पैसे पाठवण्यास सांगितले. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर केला, मात्र त्यांचा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बँकेच्या डेबीट कार्डद्वारे पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा >>> देशभरातील सर्व आधारकार्डची माहिती त्यांच्याकडे कशी पोहोचते?
या कार्डवरूनही पैसे हस्तांतरीत झाले नाहीत. काही वेळानंतर त्यांच्या दोन्ही कार्डवरून पावणेतीन लाख रुपयांचे सहा ऑनलाईन व्यवहार झाल्याचा संदेश त्यांना आले. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर रोहितला दूरध्वनी केला. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन दूरध्वनी बंद केला. त्यानंतर त्याने त्यांचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली असून याप्रकरणी व्यवहारांबाबतची माहिती बँकेकडून मागवली आहे. त्याच्या साहाय्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.