देशात अन्न सुरक्षा कायदा २००६ लागू झाल्यानंतर ज्या लघु तसेच मोठय़ा अन्न व्यावसायिकांनी कायद्याचे पालन केलेले नाही, त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या कोकण विभागाने कारवाई करून सुमारे १४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
देशात अन्न सुरक्षा कायदा २००६ लागू झाल्यानंतर अन्न औषध विभागाच्या वतीने परवाने घेण्याचे तसेच त्यांचे नूतनीकरण करण्याचे आवाहन करण्यात येत होते. असे असूनही अनेक लघु तसेच मोठय़ा अन्न व्यावसायिकांनी कायद्याच्या अटीचे पालन केलेले नव्हते. यामुळे या अन्नविक्रेत्यांवर वचक बसविण्यासाठी अन्न व औषध विभागाच्या कोकण विभागाने कारवाई करून सुमारे १४ लाखांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ज्या अन्न व्यावसायिकांनी नोंदणी केलेली नाही, त्यांच्याकडून सुमारे ३ लाख २१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत करण्यात आली. यात ठाण्यातील सचिन पान शॉप, बनारस पान सेंटर, भारत अंडा अ‍ॅन्ड बेकरी, जय अंबे ज्युस सेंटर यांसारख्या २१ दुकानांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जे अन्न व्यावसायिक कायद्यात तरतूद केल्याप्रमाणे अन्नाची विक्री करत नव्हते तसेच सेवनास हानीकारक अन्नपदार्थाची विक्री करत होते, त्यांच्याकडून ११ लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई जुलै २०१२ ते डिसेंबर २०१२ अशी करण्यात आली. यात भिंवडी येथील दालमिया काँटिनेंटल प्रायव्हेट लिमिटेड, रत्नागिरी येथील क्वालिटी बेकर्स, भिवंडी ऑईल मिल, अंबरनाथ येथील हिना ऑईल डेपो यांच्यासह अनेक मोठय़ा अन्न व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader