मालाड येथील २६ वर्षीय डॉक्टरने ऑनलाईन मागवलेल्या बटरस्कॉच आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी कंपनीतील अज्ञात कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता या घटनेच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात लक्षात आले की, पुण्यातील आईस्क्रीमचे उत्पादन करणाऱ्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याचेच बोट कदाचित आईस्क्रीममध्ये आले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे नमुने पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे बोट त्याच कर्मचाऱ्याचे आहे का? याचा तपास लागू शकेल.

मालाडमधील प्रकरणामुळे खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा एकदा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला. ज्यांच्या आईस्क्रीममध्ये बोट आढळून आले त्या डॉ. ब्रँडन फेर्रावने यांनी सदर आईस्क्रीम ऑनलाईन ऑर्डर केली होती. त्यांच्या बहिणीला आईस्क्रीमचा कोन खात असताना त्यात मांसाचा तुकडा सापडला. सुरुवातीला हा सुक्यामेव्याचा भाग असावा, अशा संशय डॉ. ब्रँडन फेर्रावने यांच्या बहिणीला आला. मात्र स्वतः ब्रँडन यांनी या तुकड्याची पाहणी केल्यानंतर त्यांना हा माणसाच्या बोटाचा भाग असल्याचे लक्षात आले.

मुंबई : डॉक्टरच्या आईस्क्रीममध्ये सापडला बोटाचा तुकडा

डॉ. ब्रँडन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आईस्क्रिम कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली. आईस्क्रीम वितळण्याआधी डॉ. ब्रँडन यांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून ठेवले होते. यावरून पोलिसांनी आईस्क्रिम उत्पादन करणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम २७२ (खाद्यपदार्थात भेसळ करणे), २७३ (हानीकारक बनलेले खाद्यपदार्थ किंवा पेय विकणे) आणि ३३६ (मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य) अन्वये गुन्हा दाखल केला.

सदर आईस्क्रीमचे उत्पादन पुण्यातील इंदापूर येथे असलेल्या फॉर्च्यून डेअरीमध्ये करण्यात येते. या प्रकारानंतर भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण (FSSAI) संस्थेने फॉर्च्यून डेअरीचा परवाना रद्द केला आणि कंपनीतील आईस्क्रीमच्या वितरणावर बंदी आणली. FSSAI च्या पश्चिम क्षेत्रीय कार्यालयाने पुण्यातील कंपनीच्या परिसराचीही पाहणी केली होती. यानंतर कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला.

जाणून घ्या, FSSAI म्हणजे काय? अन्नपदार्थाविषयीच्या तक्रारी कशा करायच्या, कोणती कारवाई होते

आईस्क्रीममध्ये बोट आढळल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी फौजदारी तपासणीही सुरू केली आहे. मानवी अवयव सापडल्यामुळे हा गंभीर गुन्ह्याचा भाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांना वाटत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finger in ice cream belongs to factory staff big update comes in mumbai shocker kvg