शिंदे, देशमुख, राम नाईक.. आता प्रफुल्ल पटेल
आपल्या खात्याचा एखादा मोठा प्रकल्प स्वत:च्या मतदारसंघात सुरू करण्याच्या राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या यादीत आता प्रफुल्ल पटेल यांची भर पडली आहे. अर्थात, विलासराव देशमुख आणि राम नाईक यांच्या मतदारसंघांतील प्रकल्प फक्त भूमिपूजनापुरतेच मर्यादित राहिले.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या अखत्यारीत असलेल्या ‘भेल’च्या वतीने पटेल यांच्या भंडारा मतदारसंघात ऊर्जा खात्यासाठी लागणारे साहित्य बनविण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत साकोली तालुक्यात होणार आहे. नागरी हवाई वाहतूक खाते असताना पटेल यांच्या मतदारसंघात गोंदियामध्ये विमान प्रशिक्षण अ‍ॅकेडमी सुरू करण्यात आली होती. अवजड उद्योग खाते आल्यावर आता भेलचा मोठा प्रकल्प सुरू होत आहे. विलासराव देशमुखांकडे अवजड उद्योग खाते असताना ‘भेल’चा  कारखाना लातूर परिसरात उभा करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. भेल आणि महाराष्ट्र शासन यांच्यात या प्रकल्पासाठी सामंजस्य करारही झाला होता. पण हा प्रकल्प भूसंपादन आणि अन्य किचकट प्रक्रियेत रखडला. विलासरावांच्या निधनानंतर हा प्रकल्प उभा राहण्याची शक्यताही पार मावळली.
राम नाईक हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री असताना त्यांनी त्यांच्या मतदारसंघात पालघर-बोईसर पट्टय़ात घरगुती गॅस सिलेंडर भरण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला. पण स्थानिक विरोधामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. काही जणांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने पुढे प्रगती होऊ शकली नाही, पण हा प्रकल्प सुरू झाला असता तर वेळ आणि पैशाची बचत झाली असती, असे नाईक यांचे म्हणणे आहे. हा प्रकल्प झाला नसला तरी पेट्रोलियममंत्री असताना मुंबईत नळाद्वारे गॅस पुरवठा करण्याचा कार्यक्रमच आपल्या काळात हाती घेण्यात आला आणि त्यामुळे लाखो मुंबई-ठाणेकरांचा फायदा झाल्याचे नाईक यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे ऊर्जा खाते असताना सोलापूरमध्ये ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. १३०० मेगाव्ॉटच्या या प्रकल्पासाठी भूसंपादनात बराच वेळ गेला. आता काम सुरू झाले असले तरी हा प्रकल्प रखडला आहे.

Story img Loader