उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे परिणाम महाराष्ट्रातही दिसत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करा, असं आवाहन केलंय. “उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक साधीसुधी नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्याने घ्या. कोणीही गाफिल राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार, तेच तुमचं भविष्य असणार आहे. तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपाला  संपवून टाका, असं आवाहन करतानाचे माझे हे भाषण उत्तर प्रदेशात व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल करा,” असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ते मुंब्रामध्ये विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

“माझ्यावर बुलंदशहर मधील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशात जाऊन भाजपा विरोधात प्रचार करणार आहे. पण काही जण भाजपाची सुपारी घेऊन उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी खेळी सुरू आहे. त्यापासून सावध राहा. स्वतःची अक्कल लावा. मत कोणाला दिले पाहिजे, हे तुम्ही ठरवा. भावनेच्या आधारे राजकारण होत नाही. तुमच्यात फूट पडणार. पण जिंकणार कोण? तर ते जिंकतील. पण नुकसान कोणाचे होणार? आपले होणार आणि देशाचे होणार?,” असं ते त्यांच्या सभेला उपस्थित उत्तर भारतीय लोकांना म्हणाले.

उत्तर प्रदेशची निवडणूक ही लोकसभा निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावते. त्या अनुषंगाने बोलताना आव्हाड म्हणाले, “या निवडणुकीवर देशातील पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे. देशात काय होणार? काय नाही? हे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर अवलंबून आहे. २०२४ मध्ये सत्तेत कोण बसणार, ते ही निवडणूक ठरवते. त्यामुळे कुणाला मतदान करायचे हे मी सांगणार नाही. परंतु भाजपा हरले पाहिजे, हे महत्वाचं आहे. भाजपाला हरवा, हे तुम्ही उत्तर प्रदेश मध्ये जाऊन लोकांना सांगा. मी स्वतः उत्तर प्रदेश मध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार आहे,” असं आव्हाड यांनी सांगितलं.  

Story img Loader