डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली भागातील गणेश घाट परिसरात सक्शन पंपाद्वारे अनधिकृतपणे रेतीउपसा करणाऱ्या तीन अज्ञात रेती माफियांविरुद्ध विष्णूनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. खाडीतून माफियांचे तीन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रेतीबंदर खाडीत अनधिकृतपणे रेतीउपसा केला जात असल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांची चाहूल लागताच रेती माफिया सक्शन पंप, डिझेल व साहित्य तेथेच टाकून एका पडावातून मुंब्य्राच्या दिशेने पळून गेले. महसूल कर्मचारी निवडणूक कामात गुंतले आहेत. याचा गैरफायदा उठवत गेल्या काही दिवसांपासून रेती माफिया सक्रिय झाले आहेत. दिवा ते कोपरदरम्यानचा खाडीकिनारा या रेती माफियांनी गिळंकृत करून टाकला आहे. यामुळे रेल्वे मार्गालाही धोका उत्पन्न झाला आहे.

Story img Loader