विद्युत विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्यानं लोकांची फसवणूक करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नातेवाईक असल्याचं सांगत या तरुणाने लोकांची फसवणूक केली होती. आरोपीने नोकरी देण्याच्या बहाण्याने ११ जणांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संदीप राऊत असं आरोपीचं नाव आहे.
आरोपीने स्वतःला महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतण्या असल्याचं लोकांना सांगितलं होतं. तसेच राऊत आपले काका असून आपण विद्युत विभागात सरकारी नोकरी लावून देऊ, या बहाण्याने आरोपी संदीप राऊतने ११ जणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबईतील दादर पोलिसांनी संदीप राऊत या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं नाव सांगत या आरोपीने लोकांची फसवणूक केल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवाय आरोपी संदीपला राऊतला अटक करण्यात आली की नाही, यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही.