नागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी असलेल्या पोलीसांवरच दोन ठिकाणी गुन्हा दाखल झाल्याची घटना ठाणे शहरात घडली आहे. यापैकी एकावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तर दुसऱ्यावर पोलीसांनी विरुद्ध दिशेन व्हॅन उभी केल्याने त्यास धडक बसून एका बाईकचालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणामूळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीसांनी दोन्ही आरोपी पोलीसांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात शिपाई पदावर काम करणाऱ्या दत्ता कदम याने गावात घर बांधता यावे यासाठी आपल्या पत्नी भाग्यश्रीस माहेरुन ५० हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. यात त्याची आई लक्ष्मी आणि बहिण जयश्री साथ देत होते. मात्र तीने पैसे आणण्यास नकार दिल्याने या तीघांकडून तीचा छळ केला जात होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने १० नोव्हेंबर रोजी स्वत:ला घरात जाळून घेतले होते. बुधवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा भाऊ संदीप चव्हाण याने ठाणे नगर पोलीसांमध्ये दत्ता कदमच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी याप्रकरणी लगेचच कारवाई करुन दत्ता कदमला अटक केली आणि त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी पोलीसाची आई आणि बहिण यांचा शोध सुरु आहे.      
दुसऱ्या घटनेत भिवंडी – ठाणे रस्त्यावर केशेळी चौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विरुद्ध दिशेस पोलिस व्हॅन उभी करण्यात आली होती. बुधवारी दुपारी रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रमोद पाटील या बाईक चालकाची पोलीसांच्या व्हॅनला जोरदार धडक बसली. यानंतर पाटील यास लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस व्हॅनचा चालक शिपाई किशोर शिंदे यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा