मुंबई : बंगुळूरू येथील कंपनीच्या मालकीची ५९३ एकर जागा परस्पर विकल्याच्या आरोपाखाली १२ जणांविरोधात विनोबा भावे (व्हीबी) नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४६ कोटी ९५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप असून याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
हेही वाचा >>> अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल – सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाची जोडणी अंतिम टप्प्यात, महानगरपालिका आयुक्तांनी केली पाहणी
बंगळूरूमधील चिक्काबुक्की येथील रहिवासी असलेले व्यावसायिक संतोष शेट्टी (५५) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या एक्सपॅट या कंपनीच्या मालकीची ५९३ एकर जागा आरोपींनी परस्पर विकून अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार रोहन गायकवाड, विपुल व रुबी जाधव, रिबेका गायकवाड, सुरजीत ढिल्लन, तुकाराम शिंदे, ओमकार निजामपूरकर, तानाजी भवर, जॉन नाडर, राजेश पवार, प्रीती मेनन, प्रवीण डिसोझा व अमोल भवर अशा १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते मुंबई, ठाणे व पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर विश्वासाने सोपवण्यात आलेली जागा त्यांनी परस्पर विकल्यामुळे कंपनीला ४६ कोटी ९५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.