मुंबईः चेंबूर येथील एका गृहप्रकल्पात ३५ जणांना घराचा ताबा न देता २१ कोटी २३ लाख रुपयांना फसवणूक केल्याच्या आरोपखाली मिडास बिल्डर्ससह पाच जणांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ११ वर्षांपासून तक्रारदाराला सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याचा आरोप असून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> हाजी अली दर्गा बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या फोनकॉलनंतर खळबळ; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
टिळक नगर पोलिसांनी मे. मिडास बिल्डर्स, मे. भक्ती बिल्डवेल, नवीन रामजी कोठारी, आयरिन एडविन डिमेलो आणि एडविन जेरी डिमेलो यांच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, १२० (ब) सह महाराष्ट्र मालकी सदनिका कायदा (मोफा) कलम ५, ८ व १३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे परिसरात राहणारे कर सल्लागार गुल श्यामदास तोतलानी (५३) यांनी याबाबत तक्रार केली आहे. मुंबईत घर असावे म्हणून तोतलानी यांनी चेंबूरच्या भक्ती मिडोज येथे २०१३ मध्ये सदनिकेची नोंदणी केली होती. त्यांच्यासह आणखी ३४ जणांनी तेथे सदनिका खरेदी केल्या होत्या. मात्र ११ वर्षे सदनिकेचा ताबा न मिळाल्याने त्यांनी याप्रकरणी महारेराकडे तक्रार केली. तसेच मिडास भक्ती मेडोज अलॉटिज् असोसिएशन तयार करून त्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. मे मिडास बिल्डर्सच्या आयरिन एडविन डिमेलो आणि मे. भक्ती बिल्डवेलचे नवीन रामजी कोठारी यांच्या चेंबूरच्या मिडास भक्ती मेडोजमध्ये त्यांनी २०१३ मध्ये गुंतवणूक केली.
हेही वाचा >>> आरबीआय मुख्यालयात बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहणं भोवलं, १२ पोलिसांचं निलंबन
ठरल्याप्रमाणे २०१३ मध्ये त्यांनी विक्रीसाठी असलेल्या इमारतीत तीन वर्षात घराचा ताबा मिळणार असल्याचे सांगितले. त्यांना २०१४ मध्ये ताबापत्र देण्यात आले होते. त्यामुळे सर्वांचा प्रकल्पावर विश्वास बसला होता. जवळपास ४० लाख ९५ हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर २०१७ मध्ये खरेदीबाबत नोंदणीही करण्यात आली. १ जून २०१३ ते १ जून २०२४ दरम्यान त्यांच्यासह ३५ जणांनी २१ कोटी, २३ लाख ६२ हजार ३०० रुपयांची गुंतवणूक केली. या सर्वाची नोंदणीही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सदनिकांचा ताबा मिळाला नाही. तक्रारदार यांच्या संघटनेच्या काही सभासदांकडून मिडास भक्ती मिडोज या इमारतीचा दहावा माळा बांधण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र नसतानाही सदनिका विक्री करून फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.