मुंबई : चार महिन्यांपूर्वीच पोलीस कुटुंबात विवाह झालेल्या एका पोलीस शिपायांच्या मुलीने चेंबूर परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्ता संकपाळ (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून ती पती हर्षद संकपाळ (२३) याच्यासोबत चेंबूर कॉलनी येथे राहत होती. युक्ता आणि हर्षद या दोघांचेही वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. लग्नापूर्वी हर्षद आणि युक्ता दोघेही चेंबूर पोलीस वसाहतीमध्ये राहत होते. याच ठिकाणी दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी परवानगी मिगितली होती. मात्र हर्षदचे कुटुंबीय या दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी दोघांनी वांद्रे न्यायालयात विवाह केला होता. त्यानंतर दोघे चेंबूर कॉलनी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते.

युक्ता २६ जुलै रोजी एकटीच घरात होती. त्यावेळी तिने गळफास लावून आत्महत्या केली. युक्ताला तिचा पती नेहमी मारहाण करीत होता. शिवाय सासू-सासरे आणि नणंद तिचा मानसिक छळ करीत होते, असा आरोप तिच्या आईने केला आहे. शिवाय मृत्युपूर्वी युक्ताने मोबाइलमध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवले आहे. पोलिसांनी तपासाअंती बुधवारी पती हर्षद, सासू शैलजा, सासरे भरत आणि नणंद रोशनी या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir registered against police family in daughter in law suicide case mumbai print news zws