मानखुर्द येथील नवजीवन महिला सुधारगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी विद्यमान अधीक्षकांसह, माजी अधीक्षक आणि सुधारगृहाचा व्यवस्थापक यांच्यासह काही अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवजीवन सुधारगृहातील अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक रश्मी करंदीकर आणि डॉ. हरीश शेट्टी यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार शनिवारी रात्री गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजीवन सुधारगृहाची दुरवस्था, तेथे असलेल्या मुलांना धमकावणे, त्यांना वाईट वागणूक देणे तसेच तेथील गैरकारभारावर या समितीने अहवालात ठपका ठेवला आहे.
या संदर्भात विद्यमान अधीक्षक शोभा शेलार, माजी अधीक्षक अश्विनी दिघे आणि व्यवस्थापक पाटील यांच्यावर गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या सुधारगृहातील तीन मुलींवर झालेल्या बलात्कारप्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधातही गुन्हा नोंदण्यात आला आहे.    

Story img Loader