दक्षिण मुंबईतील गिरगाव परिसरातील १४ मजली ‘गणेश कृपा’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये शनिवारी दुपारी २.३० च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीमुळे दुर्घटनाग्रस्त इमारत आणि आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी इमारतीत अडकलेल्या २७ रहिवाशांना सुरक्षिततेचे उपाय म्हणून सुखरूप गच्चीवर नेले. परिणामी, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
हेही वाचा >>> विक्रोळीत मिरवणुकीत सहभागी तरूणांनी केला महिला पोलिसांचा विनयभंग
गिरगावमधील सिक्का नगर परिसरातील डॉ. देशमुख लेनमधील चौदा मजली ‘गणेश कृपा’ इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये लागलेली आग क्षणातच पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टपर्यंत पसरली. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रहिवासी दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर पडले. मात्र दुर्घटनाग्रस्त इमारतीत १७ महिला, ५ पुरुष आणि ५ लहान मुले असे एकूण २७ रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून या रहिवाशांना सुखरुपपणे इमारतीच्या गच्चीवर नेले. आग इमारतीत पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.