भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नरिमन पॉईंट भागात प्रदेश कार्यालय आहे. या कार्यलयातून राज्यभरातील भाजपा संघटनेचे काम पाहिले जाते. आज रविवारी सुट्टी असल्यामुळे कार्यालयात डागडुजीचे काम सुरू होते. यावेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. यावेळी आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले.
टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन आग पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले गेले.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राुहल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड कार्यालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. माध्यमांशी बोलत असताना प्रसाद लाड म्हणाले की, कार्यालयात आग लागल्यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगीवर नियंत्रण अग्निशामक साहित्याचा वापर केला. ही आग मुख्य कार्यालयात लागली नसून कार्यालयाच्या मागच्या बाजूस लागली होती. त्यामुळे कार्यालयाचे फार नुकसान झालेले नाही.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आग लागली तेव्हा जवळपास १०० माणसे आत होते. मात्र त्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. अग्निशामक दलाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आग लवकर नियंत्रणात आली. कदाचित आगीमुळे मोठे नुकसान होऊ शकले असते. पण ते टाळले गेले. कोणत्याही व्यक्तीला इजा पोहोचलेली नाही. इतर नुकसानाचा नंतर आढावा घेण्यात येईल.
बातमी अपडेट होत आहे..