मुंबई : विद्याविहार येथील नाथानी मार्गावरील नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्सला सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत इमारतीतील सुरक्षारक्षक उदय गांगण (४३) यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच, अन्य एक सुरक्षा रक्षक जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी प्रयत्न करत आहेत.
नीलकंठ किंगडम कॉम्प्लेक्समधील तक्षशिला या तेरा मजली इमारतीला सोमवारी पहाटे आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. सर्वजण साखरझोपेत असल्यामुळे आग लागल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. हळूहळू आगीची तीव्रता वाढू लागली आणि सुमारे ५ घरांमध्ये आग पसरली. घरात धूर पसरल्याने गाढ झोपेत असलेल्या रहिवाशांना जाग आली व आरडाओरडा करत त्यांनी अन्य रहिवाशांनाही जागे केले. वाचण्यासाठी त्यांनी इमारतीबाहेर पळ काढला. मात्र, अनेकांना आग आणि धुरामुळे बाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले.
आग आणि धुरामुळे त्यांना मदतकार्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, अडचणींवर मात करून अग्निशामकांनी इमारतीत अडकलेल्या १५ ते २० रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने आग भीषण (वर्दी क्रमांक २) असल्याचे घोषित केले. या दुर्घटनेत आग लागलेल्या सदनिकेतील फर्निचर, लाकडी सामान, कपडे, विद्युत तारा, विद्युत यंत्रणा, अन्य घरगुती साहित्य जळून खाक झाले. तसेच, दुर्घटनेत उदय गांगण (४३) आणि सबाजित यादव (५२) हे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना आगीतून बाहेर बाहेर काढले. तसेच, उपचारासाठी जखमींना नजीकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दुर्घटनास्थळी अग्निशमन दलातर्फे कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.