‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त गिरगाव चौपाटीवर मागील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमाच्या रंगमंचाला लागलेल्या आगीचा अहवाल अग्निशमन दलाने बुधवारी पालिका आयुक्तांकडे सादर केला. मंचाच्या खाली सहा सिलिंडर ठेवण्यात आले होते यातील एकाचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रमात आगीपासून गणपतीची प्रतिकृती साकारण्यासाठी हे सिलिंडर ठेवण्यात आले होते. स्फोट झाला त्यावेळी मंचाजवळ ज्वलनशील वस्तू असल्याने आग पटकन पसरली.
दरम्यान, कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच अग्निशमन दलाने पाहणी अहवाल इव्हेंट कंपनीला पाठवून दिला होता. पाहणीत सिलिंडर न वापरण्याचा सल्ला अग्निशमन दलाकडून आयोजकांना देण्यात आला होता. तरीसुद्धा कार्यक्रमाच्या दिवशी सिलिंडर वापरण्यात आले, असे नमूद करून झालेल्या घटनेला आयोजकांचे ढिसाळ नियोजनच जबाबदार असल्याचे अग्नीशमन दलाने अहवालात म्हटले आहे. अग्निशमन दलाने पालिका आयुक्तांकडे अहवाल सादर केल्यानंतर तो आता मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा