Fire Break Out in Jogeshwari Oshiwara Furniture Market : मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये मोठी आग लागली आहे, मुंबई महापालिकेच्या हवाल्याने टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. ओशिवरा फर्निचर मार्केट हे मुंबईतील सर्वात मोठं मार्केट असून गेल्या महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोगेश्वरी पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावरील ए१ दरबार रेस्टॉरंटजवळील ओशिवरा फर्निचर मार्केटमध्ये सकाळी ११:५२ वाजता आग लागली. ही आग तळमजल्यावरील फर्निचर गोदामातच पसरली. मुंबई अग्निशमन दलाने आगीला लेव्हल २ ची आग (मोठी आग) म्हणून घोषित केले.

या घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली असून त्यांनी तातडीने आपत्कालीन परिस्थितीत मदत केली. आगीची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलिस आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

दरम्यान, ३१ जानेवारीला घाटकोपर पूर्व येथील कैलास प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास भीषण आग लागली होती. घाटकोपर पूर्व येथील आर. एन. भाटकर मार्गावर ऑडीन मॉलच्या समोरील एका व्यावसायिक इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. घटनास्थळी पोलीस, पालिका विभाग कर्मचारी, विद्युत वितरण कंपनीचे पथक दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबत रुग्णवाहिकाही रवाना झाली. 

मुंबईत सात नवी अग्निशमन केंद्र 

मुंबई शहराची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत आणखी सात ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कांदिवली, कांजूरमार्ग, सांताक्रूझ, चेंबूर व अंधेरी आणि सागरी किनारा मार्गालागत दोन अशी सात नवीन केंद्रे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कांदिवली आणि कांजूरमार्ग येथील केंद्रे पूर्णत्वास आली आहेत.

मुंबईत कुठेही आग लागली तर अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचतात ही मुंबई अग्निशमन दलाची एकेकाळची ख्याती होती. मात्र मुंबईतील लोकसंख्या आणि वसाहती, गाड्यांची संख्या वाढल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या अनेकदा वाहतूक कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे अग्निशमन दलाची केंद्रे वाढण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार गेल्या काही वर्षापासून मुंबई महापालिकेने अग्निशमन दलाची केंद्रे वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire break out in jogeshwari mumbai furniture market sgk